आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील युवा गजलकार, कवी पवन नालट यांच्या ‘मी संदर्भ पोखरतोय’ या काव्यसंग्रहाला साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार घोषित झाला आहे. मराठी विभागातील या पुरस्काराच्या रुपाने बहुधा अमरावतीच नव्हे तर विदर्भाला पहिल्यांदाच हा पुरस्कार प्राप्त झाला असून रोख 50 हजार रुपये व ताम्रपट असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेल्या साहित्य अकादमीने अलिकडेच देशभरातील साहित्यविषयक पुरस्कारांची घोषणा केली. त्यामध्ये युवा वर्गातून पवन नालट यांचा समावेश आहे. 35 वर्षाच्या आतील कवि, लेखक, कादंबरीकार यांनाच असा पुरस्कार दिला जातो, असा साहित्य अकादमीचा नियम आहे. अकादमीचे सचिव डॉ. के. श्रीनिवासराव यांच्या स्वाक्षरीनिशी पवन नालट यांना पुरस्कार घोषित झाल्याचे पत्र मिळाले असून या अटीचा त्यामध्येही उल्लेख आहे.
एक उत्तम कवी, निवेदक आणि भान जपणारा लेखक अशी पवन नालट यांची ओळख आहे. विशेष असे की एवढे सर्व सर्वोत्तम गुण आणि तेही युवक असतानाच आत्मसात करावे, हे त्यांचे वैशिष्ट्य असल्याचे साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठांचे म्हणणे आहे. प्रसिद्ध वऱ्हाडी कवि प्रा. विठ्ठल वाघ, कविश्रेष्ठ दत्ता भगत आणि रमेश वरखेडे या त्रीसदस्यीय निवड मंडळाने पवन नालट यांच्या ‘मी संदर्भ पोखरतोय’ या कवितासंग्रहाची साहित्य अकादमीच्या मराठी विभागातील पुरस्कारासाठी शिफारस केली होती, असेही सदर पत्रात म्हटले आहे.
उत्तम निवेदक म्हणूनही ख्याती
पवन नालट हे व्यवसायाने शिक्षक आहेत. उत्तम निवेदक म्हणूनही त्यांची ख्याती आहे. ‘दिव्य मराठी’ने आयोजित केलेल्या स्वरसम्राट राहुल देशपांडे यांच्या गीत-संगीत मैफलीचे संचालनही त्यांनी केले होते. मराठी गजलच्या क्षेत्रातील त्यांची मुसाफिरीही लपून राहिली नाही. गजलसम्राट भीमराव पांचाळे व प्रा. डॉ. राजेश उमाळे यांनी काही मंचावरुन त्यांच्या गजलांना स्वरसाजही चढविला आहे.
साहित्यात तरुणांचा सहभाग वाढवावा
साहित्य म्हटले की पारंपरिक चौकटच डोळ्यासमोर येते. बरेचदा साहित्य सम्मेलनांमध्ये साचेबद्ध कवी आणि ठरलेल्या चाकोऱ्या दिसून येतात. यावर्षीचे अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन विदर्भात होत आहे. त्यामुळे किमान या बाबीवर विचार व्हावा. तरुणांना मंच उपलब्ध करुन दिला तर कमी होत चाललेली वाचनसंस्कृतीही कायम ठेवता येईल. - पवन नालट, अमरावती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.