आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थंडी:जिल्ह्यात आगामी पाच दिवस हुडहुडी भरवणाऱ्या थंडीची शक्यता

अमरावती12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील दोन ते तीन दिवसांपासून तापमानात सातत्याने घट होत आहे. मात्र, शुक्रवारपासून तर गारठा अधिकच वाढला आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूरच्या नोंदीनुसार शनिवारी (दि. १९) अमरावती शहरात किमान तापमान १०.८ अंश सेल्सिअस नोंदवल्या गेले आहे. अशी माहिती दूर्गापूर येथील कृषी विज्ञान केंद्राच्या सूत्रांनी दिली आहे. आगामी चार ते पाच दिवस तापमानात यापेक्षाही घट होऊन हुडहुडी भरवणारी थंडी राहणार असल्याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.

सध्या मध्य प्रदेशकडून विदर्भात थंड वारे वाहत आहे, त्यामुळेच वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळेच शुक्रवारी दुपारपासून वातावरणात गारवा जाणवायला लागला आहे. त्याचप्रमाणे शनिवारीसुद्धा दिवसभर थंड वातावरण होते.

अमरावती व परिसरात नेहमी उष्ण वातावरण राहते. मात्र सध्या असलेले वातावरण नेहमीच्या तुलनेत एकदम विपरीत आहे. ही परिस्थिती २४ नोव्हेंबरपर्यंत कायम राहणार असून, सध्या असलेल्या तापमानापेक्षाही वातावरणात थंडावा वाढू शकतो, त्यामुळेच आगामी पाच दिवस हुडहुडी भरवणाऱ्या थंडीची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

रब्बीच्या पिकांना फायदा मात्र फळ बागेची काळजी घेण्याची गरज : थंडी वाढली असली तरीही जिल्ह्यातील रब्बीचे प्रमुख पिक गहू आणि जगन्यासाठी ती फायदेशीर ठरणारी आहे. कारण हरभऱ्याच्या पेरणीची वेळ तशी निघून गेली आहे. गव्हाची पेरणी आता सुरू होत आहे. याचवेळी पारा १० अंशाच्या खाली गेल्यास फळबागांवरच शेतकऱ्यांना विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कारण १० अंशापेक्षा तापमान कमी झाल्यास फळ झाडांच्या मुळा सक्रिय राहत नाही.

अशावेळी फळ झाडांना पाणी देणे फायदाच ठरु शकते. कारण पाणी दिल्यास तापमानाचे संतुलन राखण्यास मदत होऊ शकते आणि जमिनीच्या आतमधील तापमान कमी करण्यापासून रोखले जाते. अशी माहिती दुर्गा पूर कृषी हवामान केंद्राचे कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. सचिन मुंढे यांनी ‘दिव्य मराठी’सोबत बोलताना सांगितले.

दिवस-रात्रीच्या पाऱ्यात १९.२ अंशाची तफावत
शुक्रवार व शनिवारचे कमाल तापमान (दुपारी) शहरात ३० अंश होते. याचवेळी किमान तापमान १०.८ अंश (रात्री) तापमान आहे. त्यामुळे दिवस व रात्रीच्या (कमाल व किमान) तापमानात तब्बल १९.२ अंशाची तफावत आहे. वातावरणातील या बदलामुळे सध्या अनेकांना सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवत आहे. दवाखान्यात रुग्णांची गर्दी वाढत आहे.

बातम्या आणखी आहेत...