आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Amravati
  • There Is No Order From The Government Regarding Property Tax Moratorium, Tax Increment Payments Have Been Received, But What Next? Citizens Are Confused

मालमत्ता कर स्थगितीबाबत शासनाकडून आदेश नाही:करवाढीव देयके मिळाली पण पुढे काय? नागरिक संभ्रमात

अमरावती25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नियोजन भवनात ७ ऑक्टोबर रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महानगर पालिकेद्वारे शहरवासीयांवर लागू करण्यात आलेल्या ४० टक्के मालमत्ता कर वाढीला स्थगिती देण्याचे निर्देश दिले. तसेच याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलून पुढील निर्णय घेऊ असेही सांगितले. परंतु, अद्याप शासनाकडून यासंदर्भात कोणतेही मार्गदर्शन मनपा प्रशासनाला मिळाले नाही. त्यामुळे मनपा शासनाच्या आदेशाच्या प्रतिक्षेत असून नागरिक मात्र नेमके काय करायचे, अशा संभ्रमात आहेत.

महापालिकेने वाढीव मालमत्ता कराची देयके शहरवासीयांना पाठविली असून दरम्यान मालमत्तांचे मुल्यांकनही सुरू आहे. या मुल्यांकनानुसार मालमत्तांच्या स्वरूपात जो बदल झाला असेल त्यानुसार करवाढ होणार आहे. ते बघता शहरात वाढीव मालमत्ता करवाढीविरोधात आगडोंब उसळला होता. झाडून सर्वच राजकीय पक्षांनी आंदोलन केले. निवेदनं देण्यात आली.

अजुनही निवेदन देण्याचा सपाटा सुरूच आहे. परंतु, अजुनही सर्वकाही अधांतरी आहे. मालमत्ता करवाढ स्थगित होणार की वाढीव दराने कर द्यावा लागणार की, जुन्याच दराने कर भरावे लागणार याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती नाही.

महापालिकेचे मालमत्ता करापासून उत्पन्न केवळ ४७ कोटी रु. असल्यामुळे मनपा प्रशासनाने उत्पन्न वाढविण्यासोबतच आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी मालमत्तांचे मुल्यांकन करण्याचा निर्णय घेतला. अजुनही मुल्यांकनाची प्रक्रिया सुरू आहे. परंतु, ४० टक्के मालमत्ता करवाढीला स्थगिती देण्यात आली आहे.

शासनाकडून सुनावणी होते

मालमत्ता कर वाढ प्रकरणी शासनाकडून सुनावणीसाठी मनपाला पत्र दिले जाईल. त्यानंतर मुंबई येथे मंत्रालयात सुनावणी होईल. मनपाचीही बाजू ऐकून घेतली जाईल. त्यानंतर शासन पूर्ण करवाढीला स्थगिती द्यायची, ४० टक्क्यांऐवजी २० टक्केच कर आकारण्यास परवानगी द्यायची की, एखाद दुसरा मधला मार्ग काढायचा याबाबत निर्णय देईल. तोवर नागरिकांनाही वाट बघावी लागणार आहे.

शासनाच्या आदेशाची प्रतिक्षा

वाढीव मालमत्ता कराला उपमुख्यमंत्र्यांनी स्थगिती देण्यास सांगितले. याबाबत शासनाकडून लेखी आदेश यायचा आहे. नेमके काय करायचे, यासंदर्भात शासनाकडू मार्गदर्शन आल्यानंतर पुढील दिशा निश्चित होईल. म्हणूनच शासन आदेशाच्या आम्ही प्रतिक्षेत आहोत. -डाॅ. प्रवीण आष्टीकर, आयुक्त, मनपा.

मनपाकडे विचारणा

४० टक्के वाढीव मालमत्ता कराची जी देयके आमच्याकडे आली आहेत, त्याचे काय करायचे. शासनाचा आदेश येतपर्यंत थांबायचे की भरायचेच नाही. की, जुन्या दरानुसारच मालमत्ता कर भरायचा याबाबत राजकीय पक्षांसह नागरिकही संभ्रमात असल्यामुळे ते वारंवार मनपा आयुक्तांना निवेदन देत नेमके काय करायचे, अशी विचारणा करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...