आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र विक्री व वैद्यकीय विक्री प्रतिनिधी संघटनेचे (एमएसएमआरए) तीन दिवसीय साठावे राज्य अधिवेशन शुक्रवार, दि. १० जूनपासून येथे सुरु होत आहे. सध्याच्या काळात केंद्र सरकारमार्फत विक्रेता प्रतिनिधींवर कुठाराघात केला जात आहे. या पार्श्वभूमीवर या अधिवेशनातून आंदोलनात्मक निर्णय घेतला जाणार असल्याचे ‘एमएसएमआरए’चे राज्य सरचिटणीस श्रीकांत फोपसे यांनी स्पष्ट केले.
शहनाई मंगल कार्यालयात आयोजित या अधिवेशनाचे उद्घाटन सेंटर फॉर इंडियन ट्रेड युनियन्सचे (सीटू) उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांच्या हस्ते शुक्रवारी दुपारी ४.३० वाजता होणार असून तीन दिवसांत विविध मान्यवर या अधिवेशनाला शुभेच्छा देण्यासाठी कार्यक्रमस्थळी येणार आहेत. यामध्ये जलसंपदा व कामगार राज्यमंत्री बच्चू कडू, आमदार सुलभा ताई खोडके, केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे जगन्नाथअप्पा शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके आदींचा समावेश आहे. तर केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सौरभ मालाणी या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष आहेत.
फोपसे यांच्यामते सध्या देशभरातील कामगार, शेतकरी, विद्यार्थी, युवक, महिला अनेक समस्यांचा सामना करीत आहेत. केंद्र सरकारचे त्याकडे लक्ष नाही. ते वेगळ्याच मुद्द्यांमध्ये गुंतले आहे. संघटनेने वेळोवेळी या प्रश्नांवर आवाज उठवला आहे. भविष्यातही हीच भूमिका कायम राहील. दरम्यान ‘एमएसएमआरए’च्या मूळ प्रश्नांशिवाय संबंधित घटकांच्या मुद्द्यांवरही या अधिवेशनात चर्चा केली जाणार असून योग्य ते निर्णय घेतले जाणार आहे. औषध क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणारी संघटना म्हणून ‘एमएसएमआरए’ची ओळख आहे. पण त्यासोबतच सामाजिक बांधिलकी म्हणून संघटनेने आजवर केलेल्या कार्याचा लेखाजोखाही त्यांनी पत्रपरिषदेत सादर केला.
पत्रकार परिषदेला प्रदेश कोषाध्यक्ष राजेंद्र राठोड, ‘सीटू’चे जिल्हा सचिव कॉम्रेड सुभाष पांडे, संघटनेचे प्रादेशिक सचिव अभय देव, युनिट सेक्रेटरी जयेश चांडक, इतर पदाधिकारी मनीष नानोटी, मिलींद थेटे, जयेश सेठिया आदी मान्यवर उपस्थित होते. माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना ‘एमएसएमआरए’चे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत फोपसे. मंचावर अभय देव, सुभाष पांडे, राजेंद्र राठोड व इतर पदाधिकारी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.