आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दागिने लंपास:मोर्शी येथे भरदुपारी दार वाजवून घरात शिरले चोरटे; 90 ग्रॅमचे दागिने लंपास, बचावासाठी दोन चिमुकल्यांसह महिलेने मागच्या बाजूला कोंडून घेतले

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुपारी साडेबारा वाजले होते. घरातील इतर मंडळी बाहेर गेल्यामुळे महिला तिच्या दोन मुलांसह घरात होती. याचवेळी दरवाजा वाजला. त्यामुळे महिलेने दरवाजा उघडला तर चौघे तोंडाला स्कार्प बांधून घरात शिरले. मला ओळखले का? असे एकाने म्हणून महिलेचा गळा पकडण्याचा प्रयत्न केला. याचवेळी महिलेने या लुटारुच्या हाताला झटका मारला व बचावासाठी दोन्ही मुलांना घेऊन घराच्या मागील बाजूला गेली व बाहेरुन दार लावून घेतले. त्यानंतर या चारही चोरट्यांनी घरात दिवाण मध्ये असलेले सुमारे ९० ग्रॅम सोन्याचे दागिने घेऊन पोबारा ठोकला. शुक्रवारी भरदुपारी मोर्शी शहरातील शिवाजीनगरात हा प्रकार घडला.

सेवानिवृत्त शिक्षक सुरेश इंगळे हे शिवाजीनगरमध्ये राहतात. दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास चार लुटारूंनी त्यांच्या घराचे मुख्य दार ठोठावले. यावेळी घरामध्ये सुरेश इंगळे यांची सून धनश्री व दोन चिमुकले नातवंड होते. दरवाजा ठोठावण्याचा आवाज आल्याने सुनेने दरवाजा उघडला. यावेळी लुटारूंनी ओळखलं का, असे म्हणून घरात प्रवेश केला. त्यानंतर लुटारूंनी धनश्री यांचा गळा पकडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर स्वत:ची सुटका करत त्यांनी थेट मुलांजवळ धाव घेतली व मुलांना घेऊन घराच्या मागील बाजूने जावून दरवाजा लावून घेतला.

त्यानंतर लुटारूंना दिवाणच्या एका खणात लाखो रुपयांचे दागिने असलेला डबा दिसून आला. लुटारूंनी दागिने घेऊन तेथून पळ काढला. सोन्याचे दागिने (किंमत २ लाख ७० हजार रुपये पोलिसांच्या नोंदीनुसार) लुटारूंनी लंपास केले आहे. या घटनेची माहिती मोर्शी पोलिसांना दिली.

बातम्या आणखी आहेत...