आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागीच ठार:वरुड-पांढुर्णा मार्गावर अज्ञात वाहनाने चिरडल्यामुळे तीन ज्योतिषी जागीच ठार

शेंदुरजनाघाट4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वरुडकडून पांढुर्णा येथे दुचाकीने ट्रिपल सीट जाणाऱ्या ज्योतिषींच्या दुचाकीला विरुद्ध दिशेने आलेल्या भरधाव वाहनाने चिरडले. या अपघातात तिन्ही ज्योतिषींचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (दि. ११) सकाळी साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास महेंद्री जंगलातील घाट वळणावर झाला.

राजेश रामदास शिंदे (वय ४५), मनोहर रामराव लांगापुरे (३५) आणि किसन शिवनाथ लांगापूर (४०, तिघेही रा. अमळापूर, राजूरा) असे मृतकांची नावे आहे. मृत तिघेही एकमेकांचे नातेवाइक असून, भविष्य सांंगण्याचे काम करत होते. शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास ते गावावरुन पांढुर्णा येथे भविष्य सांगण्याच्या कामासाठीच मनोहर लांगापुरे यांच्या नव्या दुचाकीने निघाले होते. दरम्यान, वरुडपासून सुमारे ३२ किलोमीटर अंतरावर पुसला ते पांढुर्णा मार्गादरम्यान पंढरी गावापासून जवळच असलेल्या महेंद्रीच्या जंगलातील घाट वळणावर त्यांच्या दुचाकीला भीषण अपघात झाला.

हे तिघे घाट वळणावर असताना विरुद्ध दिशेने आलेल्या भरधाव वाहनाने दुचाकीला चिरडले. यावेळी तिघांपैकी दोघाच्या अंगावरुनच ते वाहन गेल्यामुळे त्यांचे चेहरे छिन्नविछीन्न झाले होते तर एकाला जबर मार बसल्यामुळे त्याचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच शिंदे यांचे भाऊ नाता शिंदे हे तत्काळ काही नातेवाइकांसह अपघातस्थळी पोहोचले मात्र, त्यावेळी मृतावस्थेत रस्त्यावर तर रस्त्याच्या कडेला एक जण असे तिघेही पडून होते. अपघाताची माहिती मिळताच शेंदुरजनाघाटचे ठाणेदार सतीश इंगळे त्यांच्या पथकासह पोहोचले. पोलिसांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी वरुडच्या शासकीय रुग्णालयात आणले. दुपारीच तिन्ही मृतदेहाचे शवविच्छेदन आटोपून मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आले.

एकाचवेळी तीन नातेवाइकांचा मृत्यू झाल्यामुळे शिंदे आणि लांगापुरे कुटुंबीय व त्यांच्या नातेवाइकांनी चांगलाच आक्रोश केला होता. या प्रकरणात नाता शिंदे यांच्या तक्रारीवरुन शेंदुरजनाघाट पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरू केला आहे.

बातम्या आणखी आहेत...