आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअंजनगाव ते अकोट मार्गावर असलेल्या भंडारज गावाजवळ सोमवारी (दि.१) तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला, तर तिन्ही वाहनातील १९ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी पाच प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता झाला आहे. अपघातग्रस्त वाहनांमध्ये दोन ‘मॅक्झिमो’ प्रवासी वाहन, तर एक कार आहे.
विशाल रामदास पवार (३५ रा.माळीपुरा, अंजनगाव सूर्जी) असे मृतकाचे नाव आहे. शेख आसिफ शेख आदिल (२०, रा. अंजनगाव), आसम शहा मिराकिसन शहा (६०, रा. अकोला), सुखाबाई रामचंद्र राऊत (५०, रा. अंजनगाव), गुलाब मेश्राम (५०, रा. करोडा मध्य प्रदेश), सुफीयन शहा (८ रा. अकोला), आशीयाबी शफाकत शहा (४०, रा. दर्यापूर), अरमान शरफकन (१५, रा. अकोला), अनुसया शंकर भावे (६५, रा. अंजनगांव), मो. अफजद मो. मुश्ताक (५०, रा. अकोट), रहिमाबी कासम शहा (५०, रा. अकोला), मुदरसिंग शहा समयत शहा (१५, रा. अकोला), आसमा परवीन मजवर शहा (२९, रा. अकोला), आजमा परवीन मझवर शहा (८, रा. अकोला), फतिमाबी मो. अफजद (४०, रा. अकोट), अलियाबी शफाकन शहा (१३, रा. अकोला), सुशीला वासुदेव शिनकर (६५, रा. अंजनगाव), मायरा फिरदोस (६, रा. अकोला), श्रीहरी राऊत (३१, रा. हिवरखेड), ओम नीलेश निमकाळे (१५, रा. भंडारज अंजनगाव) अशी अपघातातील जखमींची नावे आहेत. प्रकृती चिंताजनक असलेल्या प्रवाशांना पुढील उपचारासाठी अमरावती जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय परतवाडा व अकोला येथील रुग्णालयात पाठवण्यात आले. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच भंडारज येथील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच अंजनगाव सुर्जी पोलिसही घटनास्थळी पोहाेचले होते. या अपघातामुळे अकोट ते अंजनगाव मार्गावरील वाहतूक काही वेळासाठी विस्कळीत झाली होती.
ओव्हरटेक करताना झाला अपघात अंजनगाववरून अकोटकडे प्रवासी वाहतुकीसाठी ‘मॅक्झिमो’ या वाहनाचा वापर करतात. दरम्यान सोमवारी सायंकाळी अंजनगाव येथून दोन प्रवासी ‘मॅक्झिमो’ प्रवाशांना घेऊन अकोटच्या दिशेने निघाले होते. भंडारज गावाचा थांबा अवघ्या १०० ते २०० मीटर अंतरावर असताना एका ‘मॅक्झिमो’ने दुसऱ्या ‘मॅक्झिमो’ला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. ओव्हरटेकिंग सुरूच असताना अकोटकडून अंजनगावच्या दिशेने एक कार येत होती.
या वेळी ओव्हरटेक करणारे ‘मॅक्झिमो’ वाहन कारवर धडकले. त्यानंतर दुसरे ‘मॅक्झिमो’वाहन काही सेकंदापूर्वीच धडकलेल्या दोन वाहनांवर येऊन आदळले. अशा रितीने हे तिन्ही वाहन अपघातग्रस्त झाले आहे. अपघातानंतर घटनास्थळी प्रचंड धावपळ सुरू झाली. त्यामुळे कोणत्या वाहनातून कोण प्रवास करत होते, हे कळणे अवघड झाले होते. प्रवासी मिळवण्याच्या स्पर्धेत या दोन ‘मॅक्झिमो’ एकमेकांना ओव्हरटेक करत होते. व त्यामुळेच अपघात झाला असावा, अशी शक्यता काही प्रत्यक्षदर्शींनी वर्तवली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.