आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षा:बीडीओंच्या दिशेने पाण्याची बाटली फेकली; आ. भुयारांना 3 महिने शिक्षा ; पाणीटंचाईच्या विशेष सभेतील तीन वर्षांपूर्वीची घटना

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेच्या सभागृहात तीन वर्षांपूर्वी आयोजित पाणीटंचाईच्या विशेष सभेत तत्कालीन जि.प. सदस्य व विद्यमान आमदार देवेंद्र भुयार यांनी वरुडच्या तत्कालीन बीडीओंच्या दिशेने पाण्याची बॉटल व माईक फेकला होता. या प्रकरणी आमदार भुयार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. याच प्रकरणात येथील जिल्हा न्यायाधीश (क्रमांक १) एस. एस. अडकर यांच्या न्यायालयाने आमदार देवेंद्र भुयार यांना तीन महिन्यांची शिक्षा व १५ हजार रुपये दंड ठोठावला आहे. हा निर्णय न्यायालयाने आज (दि.६) दिला आहे. विद्यमान आमदार देवेंद्र भुयार हे २०१९ मध्ये जि.प. सदस्य होते. त्यांच्या सर्कलमधील पाणीटंचाईच्या मुद्दयांवर ते २८ मे २०१९ ला जि.प.मध्ये आयोजित विशेष सभेत बोलत होते. याच मुद्दयावर वरुड पंचायत समितीचे तत्कालीन बीडीओ सुभाष बोपटे हे उभे राहून माहिती देत होते. मात्र ही माहिती खोटी असल्याचा आरोप करुन भुयार यांनी बैठकीतच बोपटे यांच्या दिशेने पाण्याची बॉटल व माईक फेकला होता. या प्रकाराने सभागृहात भितीचे वातावरण तयार झाले होते. यावेळी जि.प.च्या तत्कालीन सीईओ मनिषा खत्री व इतर अधिकारी व पदाधिकारीसुद्धा सभागृहात हजर होते. या प्रकारानंतर तत्कालीन सीईओ खत्री यांनी भुयार यांच्याविरुद्ध गाडगेनगर पोलिसांत तक्रार दिली होती. तक्रारीवरुन पोलिसांनी भुयार यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास करुन पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीदरम्यान शासकीय पक्षाकडून अॅड. रणजित भेटाळू यांनी सात साक्षीदारांच्या साक्ष तपासल्या. यावेळी सुभाष बोपटे यांची साक्ष महत्वाची ठरली तसेच एकही साक्षीदार फितूर झाला नाही. या प्रकरणात न्यायालयात आमदार भुयार यांच्याविरुद्ध दोष सिद्ध झाल्यामुळे न्यायालयाने तीन महिन्यांचा साधा कारावास तसेच १५ हजार रुपये दंडाची त्यांना शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावासाची शिक्षा दिली. या प्रकरणात शासकीय पक्षाकडून अॅड. भेटाळू यांनी युक्तिवाद केला.

उच्च न्यायालयात अपील करणार : आमदार भुयार माझ्या सर्कलमधील ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी मिळत नव्हते. म्हणून मी विशेष सभेत प्रश्न विचारले. त्यावर बीडीओंनी खोटी माहिती सभागृहात दिली होती. मी त्यावेळी बीडीओंना विरोध केला. यावेळी माझा धक्का लागून बॉटल खाली पडली. पण मी बॉटल किंवा माईक फेकला नाही. माझ्याविरुद्ध खोटा आरोप करुन गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, आज न्यायालयाने दिलेल्या निकालाविरुद्ध उद्याच हायकोर्टात अपील करणार असल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...