आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेगारी वाढली:थरार! अवघ्या दीड तासात दोन खून; फ्रेजरपुऱ्यात जुन्या वादातून 17 वर्षीय युवकाला गळा चिरून संपवले

अमरावती4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आदर्शनगरात पतीने पत्नीचा गळा आवळला; मोबाइल घेण्यावरून वाद

शहरात मागील सव्वा महिन्यात पाच खून झाले आहेत. यामध्ये दोन खून गुरुवारी दुपारी सव्वाबारा ते पावणे दोन वाजेच्या सुमारास अवघ्या दीड तासात झाले. फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीत एका १७ वर्षीय युवकाचा जुन्या वादातून दोघांनी गळा चिरला तर राजापेठच्या हद्दीतील आदर्शनगरमध्ये एका नवविवाहितेचा तिच्या पतीनेच गळा आवळून खून केला. या दोन्ही खुनाने शहर पुन्हा एकदा हादरले आहे. गत सव्वा महिन्यात फ्रेजरपुरा हद्दीत झालेला चौथा खून आहे. अनिकेत ज्ञानदीप कोकने (१८, रा. यशोदानगर क्र.१) असे मृताचे नाव आहे. या खूनप्रकरणात प्रशिक बारसे आणि विशाल गडलिंग यांचा समावेश असल्याचे पोलिसांच्या प्रथमदर्शनी तपासात पुढे आले प्रशिक बारसे हा होमगार्ड जवान आहे.

गुरूवारी दुपारी बाराच्या सुमारास अनिकेत कोकने हा यशोदानगर परिसरात ‘एटीएम’वर पैसे काढण्यासाठी आला होता.तेथे प्रशिक व विशाल या दोघांनी त्याचा पाठलाग सुरू केला. त्यावेळी अनिकेतने दुचाकीने पळ काढला. मात्र, फ्रेजरपुऱ्यात एका गल्लीत दुचाकी न गेल्यामुळे अनिकेत दुचाकी सोडून पळाला. मात्र, काही अंतरावरच अनिकेत या दोघांच्या हातात लागला आणि त्याचा धारदार शस्त्राने गळा चिरून केला.. यातच अनिकेतचा घटनास्थळीच मृत्यू झाला. गुरूवारी रात्रीपर्यंत मारेकऱ्यांचा शोध लागला नव्हता. मारेकऱ्यांच्या शोधात पोलिस पथकं रवाना झाली आहेत.

नवा मोबाइल घेण्यावरून वाद; नवविवाहितेचा केला खून
राजापेठ ठाण्याच्या हद्दीतील आदर्शनगरमध्ये भाड्याच्या घरात राहणारे नवदाम्पत्य पूजा (२२) व विजय राठोड (२५) यांचे दहा महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. दरम्यान, विजय शहरातील एका मार्टमध्ये १२ हजार रुपये महिन्याने नोकरी करायचा. दोन दिवसांपूर्वी पूजाचा मोबाइल फुटला त्यामुळे तिला नवीन मोबाइल घ्यायचा होता. दरम्यान यावरुनच या दोघांचा वाद झाला होता. गुरूवारी सकाळी हे दोघे मार्केटमध्ये गेले व त्यांनी मोबाइल पाहिले. त्यावेळी पूजाला २२ हजार रुपयांचा मोबाइल पसंत आला. मात्र, सध्या पैसे नसल्यामुळे नंतर घेऊ असे विजयने पुजाला सांगून घरी आणले. त्यानंतर मात्र याच कारणावरुन दोघांमध्ये घरी वाद झाला. त्यावेळी विजयने तिच्या चेहऱ्यावर बुक्की मारली व नंतर गळा आवळला. यातच तिचा मृत्यू झाला. या प्रकारानंतर विजय थेट राजापेठ पोलिसात पोहोचला. यावेळी ठाणेदार ठाकरे त्यांच्या पथकासह विजयला घेऊन घटनास्थळी पोहोचले, त्यावेळी पूजा मृत झाली होती. या प्रकरणात राजापेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करुन विजय दादाराव राठोड (रा. पोहरा ह. मु. आदर्शनगर, अमरावती) याला अटक केली आहे.

भावाच्या खूनाचा वचपा काढण्यासाठी अनिकेतला संपवले
अनिकेतच्या महिला नातेवाइकाची बंटी बारसे म्हणजेच प्रशिकचा भाऊ याने छेड काढल्याचा आरोप होता. दरम्यान, त्याच कारणावरुन डिसेंबर २०२० मध्ये अनिकेत व त्याच्या काही साथीदारांनी बंटी बारसे याचा खून केला होता. मात्र त्यावेळी अनिकेत अल्पवयीन असल्यामुळे काही दिवसातच तोे बाल निरीक्षणगृहातून बाहेर आला. दरम्यान, भावाला जीवाने मारल्यामुळे अनिकेतचा वचपा काढण्यासाठी प्रशिकने अनिकेतचा खून झाल्याचे फ्रेजरपुरा पोलिसांनी सांगितले.

फ्रेजरपुरा ठाणेदार मेश्राम यांची तडकाफडकी बदली
फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीत ६, २१, २३ जुलै आणि १२ ऑगस्टला तब्बल चार खून झाले आहेत. यावरुनच ठाण्याच्या हद्दीतील पोलिसिंग कमकुवत झाल्याचे पुढे आल्यामुळे पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी फ्रेजरपुराचे ठाणेदार पुंडलीक मेश्राम यांची गुरूवारी सायंकाळीच तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली केली तर फ्रेजरपुराचे नवे ठाणेदार म्हणून वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक प्रवीण काळे यांची बदली केली आहे. तसेच फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीत खूनाच्या घटना वाढल्यामुळे आठ दिवसांपूर्वीच पोलिस आयुक्तांनी फ्रेजरपुरा हद्दीत गस्त वाढवण्याच्या दृष्टीने बीट मार्शल वाढवून दिले. मात्र आज खून झाला त्या परिसरात बीट मार्शल होते किंवा नव्हते, याबाबत पोलिस आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यासाठी बिट मार्शलचे लोकेशन तपासण्यात येईल, त्यानंतर संबंधितांवरही कारवाईचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्त डॉ. सिंह यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...