आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामागील काही वर्षांपासून खारपानपट्याचा शाप लागलेल्या आदिवासी बहुल तालुक्यातील शेकडो रुग्णांसाठी येथील संग्रामपूर मित्र परिवाराचे संस्थापक अध्यक्ष शंकर पुरोहित हा अवलिया खऱ्या अर्थाने देवदूत ठरला आहे. आतापर्यंत त्यांनी सहाशे रुग्णांची स्वखर्चाने सर्जरी करून त्यांना जीवदान दिले आहे. शेकडो रुग्णांना लाखो रुपयांची आर्थिक मदत केली आहे. एवढेच नव्हे तर सामाजिक दायित्वाच्या माध्यमातून तब्बल २८ वेळा रक्तदान शिबिरे घेऊन एक हजारांहून अधिक रक्ताच्या बाटल्या रक्तपेढीत जमा केल्या आहेत.
समाजसेवेने झपाटलेल्या शंकर पुरोहित यांनी सहा वर्षापूर्वी संग्रामपूर मित्र परिवाराची स्थापना केली. या परिवाराच्या माध्यमातून ते रुग्णांसह गरजूंना आर्थिक मदत करत आहेत. आतापर्यंत त्यांनी संग्रामपूर, तेल्हारा, सूनगाव, जामोद, वरखेड यासह इतर गावांतील रुग्णांना लाखो रुपयांची मदत केली आहे. संत गाडगेबाबा रोटी अभियानाला एक लाख रूपये वर्गणी दिली. पाणी फाउंडेशनसाठी श्रमदान करून गावा-गावाला पाणीदार बनवण्यासाठी त्यांनी स्वखर्चाने डिझेलची व्यवस्था केली. रात्री दोन ते तीन वाजेपर्यंत पाण्याच्या टाकीवर पहारा देऊन शहरातील नागरिकांना पाचव्या दिवशी पाणी कसे मिळेल, यासाठी प्रयत्न केले. आज पर्यंत त्यांनी आठ ते नऊ वेळा आरोग्य शिबिरे घेऊन मोफत चष्मे व शस्त्रक्रिया मोफत करून दिल्या.
लॉकडाऊन काळात शहरात रक्तदान शिबिरे घेऊन हजारो पिशव्या रक्त पेढीत जमा केल्या. याच काळात त्यांनी साडे सातशे गोरगरीब कुटूंबाला मोफत धान्य देवून त्यांच्या पोटाची खळगी भरली. ईद निमित्त पाचशे कुटूंबाना शिरखुर्मा किटचे वाटप करून मुस्लीम बांधवाची ईद साजरी केली. तसेच १४ एप्रिल रोजी अडीचशे कुटुंबांना खिरीचे साहित्य वाटप करून भीम जयंती साजरी केली. कोरोना काळात नागरिकांना मास्क, सॅनिटायझर व इतर साहित्याचे वाटप करून प्रशासनाला सहकार्य केले. संग्रामपूर मित्र परिवाराच्या माध्यमातून पंचक्रोशीतील मृतांसाठी शवपेटी उपलब्ध करून दिली. एचआयव्हीग्रस्त मुलांना कपडे वाटप करून त्यांच्या सोबत दरवर्षी अनाथाश्रमात दिवाळी साजरी करत आहेत. विशेष म्हणजे हे सर्व करताना त्यांनी कुठल्याच प्रसिद्धीची अपेक्षा केली नाही. रुग्ण सेवा हिच ईश्वर सेवा समजून शंकर पुरोहित यांचे सामाजिक कार्य अविरतपणे सुरूच आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.