आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापृथ्वी सूर्याभोवती फिरते पण सूर्याभोवती पृथ्वी अचूक वर्तुळाकार मार्गाने फिरत नाही तर लंब वर्तुळाकार मार्गाने फिरत असते. पृथ्वी कधी सूर्यापासून लांब असते तर कधी सूर्यापासून जवळ असते. साधारणतः दरवर्षी ३ जानेवारीच्या आसपास एखादा दिवस मागे-पुढे पृथ्वी सूर्याच्या सर्वात जवळ असते. आज, दि. ३ जानेवारी रोजी पृथ्वी सूर्य हे अंतर सरासरी १४.७१ कोटी कि.मी. राहणार आहे. सरासरी नेहमी हे अंतर १५ कोटी कि.मी. असते. आज होणाऱ्या खगोलीय घटनेचा जीवसृष्टीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर म्हणाले.
या दिवशी पृथ्वी जुलै महिन्यापेक्षा सरासरी ५० लाख किलोमीटरने सूर्याजवळ असेल. पृथ्वी सूर्य अंतर कमी असणे, या खगोलीय घटनेला उपसूर्य असे म्हणतात. सूर्य हा तप्त वायूचा गोळा असून, यामध्ये हायड्रोजन पासून हेलियम बनण्याची क्रिया अहोरात्र चालू असते. सूर्याच्या केंद्रामध्ये एका सेकंदात ६५ कोटी ७० लाख टन हायड्रोजन जळते. त्यापासून ६५ कोटी २५ लाख टन हेलियम बनते. कमी झालेल्या ४५ लाख टन वस्तुमानाचे रुपांतर सौर ऊर्जेमध्ये होते. सूर्यामध्ये हायड्रोजन पासून हेलियम बनते, हा शोध १९३९ मध्ये हॅन्स बेथ या वैज्ञानिकाने लावला. सूर्यावर ज्या भागाचे तापमान कमी होते, त्या भागावर सौर डाग पडतात. या डागाचे चक्र ११ वर्षाचे असते. या डागाचा शोध १८४३ मध्ये श्वाबे नावाच्या वैज्ञानिकाने लावला. या डागाचे आजपर्यंत २३ चक्र पूर्ण झाले. फेब्रुवारी २००८ पासून २४ वे चक्र सुरु झाले.
दरम्यान, आज होणाऱ्या खगोलीय घटनेचा जीवसृष्टीवर कोणताही परिणाम होणार नाही. अशी माहिती मराठी विज्ञान परिषद, अमरावती विभागाचे अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी दिली आहे. खगोलप्रेमी व अभ्यासकांना ही एक संधीच आहे.
आजपर्यंत सूर्याच्या २० फेऱ्या झाल्या पूर्ण
सूर्याला आकाशगंगेच्या मध्याभोवती १ फेरी मारण्यास २२५ दशलक्ष वर्षे लागतात. सूर्य हा आकाशगंगेच्या मध्याभोवती २५० किलोमीटर प्रति सेकंद या वेगाने फिरत आहे. आजपर्यंत सूर्याचे २० फेऱ्या पूर्ण झाले आहे. सूर्याचे वय निश्चित करणारे पहिले वैज्ञानिक सर ऑर्थर एडींग्टन हे होय. सूर्याचे एकूण आयुष्य १० अब्ज वर्षे आहे. त्यापैकी ५ अब्ज वर्ष संपले आहे. आणखी ५ अब्ज वर्षांनी सूर्याचा मृत्यू हा श्वेत बटू ताऱ्यात होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.