आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक:आज साडेतीन लाख मतदार ग्रा. पं. चे कारभारी निवडणार

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील २५७ ग्रामपंचायतींची निवडणूक अवघ्या काही तासांवर आली असून, रविवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळात मतदान घेतले जाईल. सहा ग्रामपंचायती अविरोध निवडल्या गेल्याने २५१ सरपंच आणि सदस्यांच्या ३ हजार ८५२ जागांसाठी ही निवडणूक घेतली जात आहे. त्यासाठी अनुक्रमे १ हजार ६ आणि ३ हजार ८५२ उमेदवार मैदानात आहेत. या सर्वांना ३ लाख ५१ हजार ३८६ मतदार मतदान करतील.

मतदानाच्या दिवशी सर्वत्र कोरडा दिवस घोषित केला आहे. त्यामुळे त्या दिवशी ग्रामीण भागात मद्य विक्रीवर बंदी घालण्यात आली असून, कत्तलखाने तसेच आठवडी बाजारही बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्याचवेळी मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था राखली जावी म्हणून मतदान व मतमोजणीचे कार्यक्षेत्रात जमावबंदीचे कलम १४४ देखील लागू केले आहे. मतदानासाठी ८३५ मतदान केंद्रांची घोषणा केली असून, संवेदनशील मतदान केंद्रांसाठी अतिरिक्त पोलिस कुमकही तैनात ठेवली जाणार आहे. दरम्यान मतदानाच्या दृष्टीने नेमलेल्या सर्व पोलिंग पार्टीज शनिवारी दुपारनंतर आपापल्या निश्चित स्थळी रवाना झाल्या असून, त्यांनी मतदान केंद्रे ताब्यात घेतली आहेत. अमरावती आणि भातकुली तालुक्यातील पोलिंग पार्टीज् आवश्यक त्या साहित्यासह दुपारनंतर रवाना झाल्या. त्यासाठी दीड हजारावर अधिकारी-कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेची रिहर्सल समजली जाणारी ही निवडणूक आहे. सरपंचांची निवडणूक थेट होत असल्यामुळे या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी सहभाग घेतला आहे. २५७ पैकी २५१ सरपंचांसाठी आता १ हजार ६ तर सदस्यांच्या १ हजार ६८४ जागांसाठी ३ हजार ८५२ उमेदवार मैदानात आहेत. या सर्वांना ३ लाख ५१ हजार ३८६ मतदार मतदान करतील. यामध्ये १ लाख ८० हजार ८२५ पुरुष आणि १ लाख ७० हजार ५४० महिलांचा समावेश आहे.

मतमोजणी २० डिसेंबरला २८ नोव्हेंबरपासून या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. दरम्यान २ डिसेंबरपर्यंत प्राप्त अर्जांची छाननी ५ डिसेंबर करून त्याच दिवशी वैध, अवैध अर्जांची यादी घोषित केली गेली. त्यानंतर ७ डिसेंबरपर्यंतचा वेळ उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी देण्यात आला. ठरलेल्या वेळापत्रकानुसार रविवार, १८ डिसेंबरला मतदान घेतले जात असून मंगळवार, २० डिसेंबरला सकाळी १० वाजेपासून त्या-त्या तहसील कार्यालयात मतमोजणी केली जाईल.

पाच गावचे सरपंच अविरोध : जिल्ह्यातील २५७ ग्रामपंचायतींपैकी चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी संगम, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील चिखली वैद्य, वरुड तालुक्यातील डवरगाव, मोर्शी तालुक्यातील बेलोना आणि दर्यापूर तालुक्यातील सांगवा बुजुर्ग या पाच गावांतील सरपंच व सदस्य अविरोध विजयी झाल्याने त्याठिकाणी प्रत्यक्ष निवडणूक होणार आहे. याशिवाय काही ग्रामपंचायतींमध्ये सरपंच अविरोध विजयी झाल्याने त्या ठिकाणीदेखील त्या पदाची निवडणूक टळली आहे. परिणामी सार्वत्रिक मतदान हे २५२ ग्रामपंचायतींमध्येच घेतले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...