आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अचलपूर शासकिय तंत्रनिकेतन महाविद्यालयात गैरप्रकार:पॉलिटेक्निक विषयाच्या प्रश्नपत्रिकेचे फोटो काढले अन् मित्राला बाहेर पाठवले; 3 विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल

अमरावती8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अचलपूर येथील शासकिय तंत्रनिकेतन महाविद्यालयात सद्या पॉलिटेक्निकच्या उन्हाळी 2022 ची पुर्नपरिक्षा (सप्लीमेंटरी) सुरू आहे. या परिक्षेसाठी आलेल्या दोन विद्यार्थ्यांनी परिक्षा सुरू झाल्यानंतर परिक्षा केन्द्र खोलीतून प्रश्नपत्रिकेचे फोटो काढले आणि बाहेर असलेल्या मित्राला पाठवले. हा गैरप्रकार भरारी पथकाच्या निदर्शनास आल्यामुळे त्यांनी तिघांविरुध्द परतवाडा पोलिसात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे.

एमएसबीटी अंतर्गत सद्या पॉलिटेक्नीकच्या पुन:परिक्षा सुरू आहेत. अचलपूरातील शासकिय तंत्रनिकेत महाविद्यालयात शनिवारी कम्पुटर इंजिनिअरींग शाखेचा ‘प्रोगामिंग विथ पायथॉन’ या विषयाचा पेपर होता. परिक्षा सुरू झाल्यानंतर काही वेळातच भरारी पथक परिक्षा केन्द्रावर पोहचले. यावेळी भरारी पथकातील प्रा. एस. जी. गजभिये, प्रा. आर. एस. माजगावकर यांनी पर्यवेक्षक आशिष नागे यांच्यासह परिक्षार्थ्यांची तपासणी सुरू केली. त्यावेळी एका 20 वर्षीय विद्यार्थ्यांकडे मोबाईल दिसला. परिक्षा केन्द्रात मोबाईल घेवून जाण्यास बंदी असतानाही त्याने मोबाईल आत नेला होता.

भरारी पथकाच्या शिक्षकांनी मोबाईल ताब्यात घेवून तपासला असता विद्यार्थ्यांना जी प्रश्नपत्रिका दिली होती, त्या प्रश्नपत्रिकांचा फोटो काढून या विद्यार्थ्याने बाहेर बसलेल्या एका पॉलिटेक्निकच्याच मित्राला पाठवली होती. बाहेर बसलेला हा विद्यार्थीसुध्दा पॉलिटेक्निनच्या ‘सिव्हील’ शाखेचा होता. तसेच हा मोबाईल त्याच परिक्षा केन्द्रावर परिक्षा देणाऱ्या अन्य एका 21 वर्षीय विद्यार्थ्याचा होता. हा गैरप्रकार समोर येताच भरारी पथकाने ही माहीती शासकिय तंत्रनिकेतचे प्रा. आनंद धाकडे यांना दिली. विद्यार्थ्याकडून एक मोबाईल, परिक्षा देणारे दोन व ज्याला फोटो पाठवले तो विद्यार्थी अशा तिन्ही विद्यार्थ्यांना घेवून परतवाडा पोलिस ठाण्यात पोहचले. आनंद धाकडे यांच्या तक्रारीवरुन तिन्ही विद्यार्थ्यांविरुध्द परतवाडा पोलिसांनी महाविद्यालयीन परिक्षा मंडळ व ईतर विनीर्दिष्ट परिक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिंबध अधिनियम 1962 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

तिघांना ताब्यात घेवून समजपत्रावर सोडले

तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला. याचवेळी तिन्ही विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. मोबाईल जप्त केला आणि समजपत्रावर त्या विद्यार्थ्यांना सोडले असून तपास सुरू आहे.

- एपीआय प्रशांत गित्ते, प्रभारी ठाणेदार, परतवाडा.