आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआरोग्य विभागाच्या सचिव पदावरून ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांना हटवल्याने राष्ट्रवादी शहर जिल्हा व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्यासमोर त्यांनी जोरदार नारेबाजी केली.
सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची बदली रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. सनदी अधिकारी तुकाराम मुंढे हे दोन दिवसांपूर्वीपर्यंत आरोग्य विभागाचे सचिव होते. एक सुधारणावादी व तटस्थ प्रशासक अशी त्यांची ख्याती आहे. त्यामुळेच त्यांची बदली करण्यात आली असून त्यांना हटविण्यामागे मोठे षडयंत्र असल्याचे राष्ट्रावादीचे म्हणणे आहे. त्यांच्यामते सरकारमधील काही जण कदाचित आरोग्य विभागाच्या वेगवेगळ्या घोटाळ्यांमध्ये गुंतले असावे. प्रशासकीय यंत्रणेने त्यांच्यापर्यंत पोहचू नये म्हणूनच मुंढ यांची बदली करण्यात आली आहे. त्यामुळेच ती रद्द करण्याची मागणी यावेळी मंत्र्यांसमोर रेटण्यात आली.
आरोग्य विभागाच्या पदावरून सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांना का हटविले, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आरोग्यमंत्र्यांना जाब विचारला. तुकाराम मुंढे यांची बदली केल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते संतप्त झाले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून यावेळी शिंदे-फडणवीस सरकारचा निषेध करण्यात आला. तुकाराम मुंढे यांची बदली रद्द करून तातडीने त्यांना आरोग्य विभागात रुजू करा, अशी मागणी यावेळी रेटून धरण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत डवरे, मनपाच्या स्थायी समितीचे माजी सभापती अविनाश मार्डीकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी वाहिद खान, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष ऋतुराज राऊत, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष आकाश हिवसे, के.एम. अहमद, आनंद मिश्रा, अशोकराव हजारे, ऍड. सुनील बोळे, प्रशांत उर्फ गुड्डू धर्माळे, प्रमोद महल्ले, राजेंद्र खोरगडे, संजय बोबडे, विशाल तायडे, मनोहर रहाटे, किशोर देशमुख, किशोर भुयार, संजय कुकरेजा आदींची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.