आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुक्तसंवाद:लोकानुनयापेक्षा सत्यानुनय महत्त्वाचा; शरद बाविस्कर यांचे प्रतिपादन

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘भुरा’चे लेखन जाणीवपूर्वक झाले नाही, तर योगायोगाने झाले. कोरोना काळात फेसबुकवर काही पोस्ट टाकल्या. त्या लोकांना तर भावल्याच; पण त्यावर मराठीतील काही मान्यवर प्रकाशकांचे फोन आले. त्यामुळे मी माझा शैक्षणिक प्रवास मराठीत लिहून काढला. हे लेखन करताना मी लोकानुनयापेक्षा सत्यानुनयाला महत्त्व दिले, असे प्रतिपादन ‘भुरा’ आत्मकथनाचे लेखक प्रा. शरद बाविस्कर यांनी केले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा मराठी विभाग आणि आयआयएमसी अमरावती यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या “भुरा’ वरील मुक्त संवादाच्या निमित्ताने ते बोलत होते. मराठी विभागप्रमुख आणि अधिसभा सदस्य डॉ. मोना चिमोटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला प्रा. अनिल जाधव, परिसंवादातील वक्ते प्रा. भगवान फाळके व अभिजित इंगळे उपस्थित होते. मराठी विभागातील संशोधक विद्यार्थी अभिजित इंगळे यांनी ‘भुरा’तील शैक्षणिक संघर्षाची उकल केली. येथे लेखक आपले जगणे अतिरंजित करून त्याचे उदात्तीकरण करत नाही, तर अभ्यासकाच्या तटस्थ दृष्टीने सर्व मांडत जातो.

आपल्या शिक्षण व्यवस्थेतील चातुर्वर्ण्य तो उघड करतो. हा नायक बुद्धिमान आहे, तसा कृतज्ञही आहे. आपल्या आईचे आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे तो फार आस्थेने चित्रण करतो. विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे हे आत्मकथन आहे. हे आत्मकथन एक प्रभावी राजकीय हस्तक्षेप असून, ते आत्मभान आलेल्या गरीब माणसाचे आत्मकथन आहे. त्यामुळे श्रीमंत घरंदाजपणाच्या चौकटीबाहेर पडून लेखक येथील जातीबद्ध वास्तवाचे भेदक दर्शन घडवू शकला. परंपरा आणि आधुनिकता या द्वंदात अडकलेल्या जातींच्या मुक्तीची पहिली पायरी म्हणून ‘भुरा’ हे अतिशय प्रभावी पुस्तक आहे. यातील भूगोल आणि बोलीभाषा यांनी केंद्र आणि परिघ यांची अदलाबदल केली आहे. अभिजनांनी केवळ विनोदनिर्मितीसाठी वापरलेली बोलीभाषा लेखकाने येथे गंभीर तत्त्वज्ञान व्यक्त करण्यासाठी वापरली आहे. लेखकाच्या लेखनामागील फुले-शाहू-आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानाचा पाया या आत्मकथनातून जागोजाग व्यक्त होतो, असे प्रा. भगवान फाळके म्हणाले.

अध्यक्षीय भाषणात डॉ. मोना चिमोटे यांनी या आत्मकथनावर भाष्य केले. हे लेखन सत्यकथनाच्या निकषावर पुरेपूर उतरणारे आहे. लेखकाने आपल्या शैक्षणिक प्रवासातला संघर्ष फार प्रभावीपणे रेखाटला असून, तो वाचकाला प्रभावित करणारा आहे. व्यवस्था अनेकांना संधीपासून कशी वंचित ठेवते व त्यांचे शोषण करते याचे फार मार्मिक विश्लेषण या आत्मकथनात आले आहे, असे त्या म्हणाल्या. परिसंवादातील वक्त्यांची भाषणे झाल्यावर प्रा. बाविस्कर यांनी विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधला. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी फार मुद्देसूद उत्तरे दिली.

विद्यापीठ गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली. आयआयएमसीचे संचालक डॉ. के.व्ही. भारती यांनी लिखित स्वरूपात पाठवलेला संदेश वाचून दाखवत प्रा. जाधव यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रणव कोलते यांनी केले. प्रा. हेमंत खडके यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी विद्यापीठाच्या सभागृहामध्ये विद्यार्थ्यांची आणि मान्यवर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

बातम्या आणखी आहेत...