आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संशोधनाचा खर्च वाया:आवश्यक प्रक्रिया न झाल्याने हळद बेणे सडले; लपवण्यासाठी फेकले कचऱ्यात

परतवाडा2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अचलपूर कृषी संशोधन केंद्राचा गलथान कारभाराचा नमुना

हळद हे पीक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या संपन्न करणारे आहे. हळदीची आर्थिक उलाढाल बाजारात सतत वाढत आहे. मराठवाड्यात मोठया प्रमाणात उत्पादित होणाऱ्या हळदीचे क्षेत्र विदर्भात वाढावे, याकरिता शासन कृषी विद्यापीठामार्फत हळद प्रकल्पासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करत प्राधान्य देण्याचा प्रयत्न करत असताना डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला द्वारा संचालित अचलपूर येथील कृषी संशोधन केंद्रात मात्र हजारो रुपयांचे हळदीचे बेणे सडल्याने ते चक्क कचऱ्यात व इतरत्र फेकून विल्हेवाट लावण्यात आली आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत अचलपूर कृषी संशोधन केंद्रावर दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र या संशोधन केंद्राचा फारसा फायदा या भागातील शेतकऱ्यांना होताना दिसून येत नाही. एकीकडे संत्रा फळबागा नष्ट होण्याच्या मार्गावर असून. संत्रा फळावर येणारे रोग, विविध संकटांनी शेतकरी संत्र्याऐवजी नगदी पीक म्हणून हळदीच्या लागवडीकडे वळला आहे. असे असताना हळद पिकाबाबत मार्गदर्शन सोडा या केंद्रात उत्पादित केलेले हळदीचे बेणे सुरक्षित ठेवणेही शक्य झाले नाही.

या संशोधन केंद्रांतर्गत २.८० एकरावर म्हणजेच १.१२ हेक्टरवर या वर्षी हळद पेरणी क्षेत्र बियाण्याकरिता निश्चित करण्यात आले होते. ‘बीबीएफ’ पद्धतीने ही लागवड करण्यात आली होती. तंत्रशुद्ध पद्धतीने हळदीची लागवड करण्याकरिता ‘पीडीकेव्ही-वायगाव’ या वाणाची निवड करण्यात आली. जेणेकरून उत्पादित झालेले बेणे इतरत्र संशोधन केंद्र व शेतकऱ्यांना वितरीत करता येईल. जवळपास २८ क्विंटल बेण्याची लागवड या संशोधन केंद्रांतर्गत करण्यात आली. त्यातून १०० क्विंटल उत्पादन झाले. हळदीचे गठ्ठा बी व्यवस्थीत साठवून ठेवणे आवश्यक असताना कुठल्याच तंत्रशुद्ध प्रक्रियेचा वापर करण्यात आल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे जवळपास अर्ध्यापेक्षा अधिक हळदीचे बेणे खराब झाले आहे. विशेष म्हणजे हळद बेणे उत्पादनावर हजारो खर्च करण्यात आला.

हळद काढणी झाल्यानंतर काढणी बियाण्यासाठीचे कंद शक्य तेवढ्या लवकरच सावलीत ठेवावे लागतात. मातृ कंद किवा बंडा बेणे साठवणीसाठी वाळलेले गवत, गव्हाचे कुटार व कार्बोडाझींम, क्विनॉलफॉसचा वापर करावा लागतो. त्याचप्रमाणे बेणे हवा खेळत राहील अशा ठिकाणी साठवणे योग्य नसते. त्यामुळे कंद सडतात. नेमके या बाबीकडे दुर्लक्ष करण्यात आले. ५० क्विंटल हळद एका ठिकाणी खड्डा करून ठेवण्यात आली. मात्र नंतर त्याकडे दुर्लक्ष झाले, तर उर्वरित ५० क्विंटल हळद बंद खोलीत ठेवण्यात आली. मात्र आवश्यक ती प्रक्रिया झाली नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हळदीचे बेणे सडले. हा प्रकार उघडकीस येऊ नये म्हणून हळदीचे बेणे प्रकल्पातील शेतातील नाल्यात, कचऱ्यात व रस्त्यावर फेकून विल्हेवाट लावण्यात आली. याबद्दल नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे.

हळद बेण्यावर प्रक्रिया केली; खराब होण्याचे प्रमाण नगण्य
अचलपूर कृषी संशोधन केंद्रांतर्गत मागील वर्षी २.८० एकरावर हळदीच्या बेण्याची बियाण्यांकरिता लागवड करण्यात आली होती. उत्पादित झालेल्या १०० क्विंटल बेण्यातील १५ ते २० क्विंटल बेणे खराब झाले आहे. उर्वरीत बेण्यांची कृषी विज्ञान केंद्र व अचलपूर येथील कृषी संशोधन केंद्रात लागवड केली जाणार आहे. हे बेणे खराब होण्याचे प्रमाण नगण्य होते.
-डॉ. योगेश चर्जन, प्रभारी अधिकारी, कृषी संशोधन केंद्र, अचलपूर

बातम्या आणखी आहेत...