आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संवाद:दोनशे वर्षांपूर्वीचे हक्क केंद्र सरकारने गुंडाळले, कामगारांचे भविष्य अंधकारमय; जागतिक कामगार दिनी प्रा. शर्मा यांनी व्यक्त केली भीती, सर्वांना एकजूट होण्याचे आवाहन

अमरावती18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोनशे वर्षांपूर्वीची तत्कालीन सरकारे आणि इतर यंत्रणांविरुद्ध संघर्ष करून कामगार-कर्मचाऱ्यांनी त्यांचे हक्क मिळवून घेतले. परंतु सध्याच्या केंद्र सरकारने नवा ‘लेबर कोड’ आणत ते सर्व अधिकार गोठवले आहेत. त्यांनी केवळ संपच बेकायदेशीर ठरवला नसून संपकर्त्यांना मदत करणारे तसेच त्यांची बाजू मांडणारेही कारवाईच्या कचाट्यात अडकतील, अशी तरतूद करून ठेवली आहे. परिणामी कामगार-कर्मचाऱ्यांचे भवितव्य अंधकारमय झाले असून, त्याविरुद्ध लढा देण्यासाठी सर्वांची एकजूट आवश्यक आहे.

अमरावती जिल्हा ट्रेड युनियन कौन्सिलतर्फे शहरातून फेरी काढून जागतिक कामगार दिन साजरा करण्यात आला. सदर रॅलीचा समारोप ऊर्जा भवन येथील सभेत झाला. या वेळी अध्यक्षस्थानी असलेल्या प्रा. उदयन शर्मा यांनी ही भूमिका मांडली. ट्रेड युनियन कौन्सिलचे कार्याध्यक्ष डी. एस. पवार, सचिव जे. एम. कोठारी, सुभाष पांडे आदी उपस्थित होते. प्रा. शर्मा म्हणाले, कामगारांनी अत्यंत परिश्रमपूर्वक काही हक्क मिळवले होते. कामांचे तास, आठवड्याची सुटी, आजारपणातील पगार, सूड भावनेने वागणाऱ्या व्यवस्थापनाविरुद्ध दाद आदी मुद्यांचा त्यात समावेश आहे. परंतु सध्याच्या भांडवलदारधार्जिणे सरकारने हे सर्व बदलण्याचा सपाटा लावला आहे. विशेष म्हणजे त्यासाठीची कृती स्वत: करणे शक्य नाही म्हणून काही विशिष्ट कंपन्यांकरवी हे षड्यंत्र अंमलात आणले जात आहे.

उद्योजकांचे हित साध्य करणाऱ्या कायद्याने तो ऐकत नसेल तर गुंडांकरवी त्याचा खात्मा करण्याचा प्रकारही काही ठिकाणी होत आहे. मुळात जे कामगार, कष्टकऱ्यांच्या हिताची गोष्ट करतात, त्यांना बेधडक तुरुंगात डांबले जात असून ज्यांच्या विरोधात सबळ पुरावे मिळाले, त्यांच्याबद्दल दिलासा दाखवला जात आहे. हे सर्व बदलायचे असेल तर मार्क्सच्या हाकेनुसार जगातील कामगारांना एक व्हावेच लागेल.

प्रारंभी ट्रेड युनियन कौन्सिलचे संघटक चंद्रकांत बानुबाकोडे यांनी सूत्रसंचालन केले. आभार सुभाष पांडे यांनी मानले. प्रारंभी इर्विन चौक स्थित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून वाहन फेरी काढण्यात आली. ही फेरी चित्रा चौक, प्रभात चौक, गांधी चौक, रवीनगर मार्गे राजापेठ, राजकमल चौक असे मार्गक्रमण करत रेल्वे स्टेशन चौकस्थित ऊर्जा भवनात पोहोचली. याठिकाणी सभेद्वारे समारोप करण्यात आला.

फेरी व सभेला वर्षा पागोटे, ललिता अटाळकर, अॅड. डी. एस. कपाळे, नामदेव गडलिंग, दीपक विधळे, सुनील देशमुख, महेश जाधव, भास्कर रिठे, राजेंद्र राऊत, रमेश सोनुले, नीळकंठ ढोके, मुकुंद काळे आदी अनेक कामगार-कर्मचारी संघटनांचे पुढारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...