आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दणका:दोन राज्य; 80 पोलिस, 8 तासांत दारूच्या 26 हातभट्ट्यांवर कारवाई

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गावठी हातभट्ट्या सुरू होत्या. या भट्ट्यांवर स्वतंत्रपणे कारवाई करणे महाराष्ट्र किंवा मध्य प्रदेश यापैकी कोणत्याही एका पोलिस घटकाला शक्य नव्हते. त्यामुळे शनिवार, दि. २७ ऑगस्टला सकाळी ६ पासून दोन्ही राज्यांचे पोलिस मिळून ९ अधिकारी व ७१ अंमलदार असे एकूण ८० जणांच्या पथकाने या भागात कारवाई करून गावठी दारूच्या २६ भट्ट्या नष्ट केल्या. या वेळी तयार दारू व दारुसाठी आवश्यक असलेला सडवा व इतर मुद्देमाल असा एकूण २६ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज जप्त करून नष्ट केला आहे. तसेच ५० पोलिसांच्या पथकाने सलग दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी (दि. २८) मोर्शीलगत असलेल्या सालबर्डी भागातही कारवाई केली आहे.

चांदूर बाजार तालुक्यातील ब्राम्हणवाडा थडी आणि शिरजगाव कसबा या दोन पोलिस ठाण्यांच्या हद्द मध्य प्रदेशच्या सीमेला लागून आहे. मध्य प्रदेशातील खोमई व आठनेर या दोन पोलिस ठाण्यांच्या हद्द येतात. गावठी दारू काढणारे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या अगदी सीमेवर भट्टी लावतात. कोणत्याही एका पोलिसांनी कारवाईचा प्रयत्न केला तर अवघ्या काही वेळातच ते भट्टी सोडून महाराष्ट्राचे पोलिस गेले तर मध्य प्रदेशच्या सीमेत जातात आणि मध्य प्रदेश पोलिस आले तर महाराष्ट्राच्या सीमेत येतात. त्यामुळे कायदेशीर कारवाई करताना पोलिसांना अडचणी येतात. ही बाब पोलिसांच्या लक्षात आल्यामुळे अमरावती पोलिस व मध्य प्रदेश पोलिसांनी शनिवारी सकाळपासून संयुक्तरीत्या कारवाई करण्याचे ठरवले.

त्यामुळे अमरावती एलसीबी, शिरजगाव कसबा, ब्राम्हणवाडा थडी येथील पोलिसांसह मध्य प्रदेशातील खोमई व आठनेर पोलिस ठाण्यातील असे एकूण ७० अंमलदार व ९ अधिकाऱ्यांचे पथक या परिसरात पोहाेचले. सकाळी ६ पासून या भागात सुरू असलेल्या २६ गावठी दारूच्या भट्ट्या नष्ट केल्या. यावेळी काही भट्टी रनिंग होत्या तर काही भट्टींवर गावठी दारूचा साठा तयार होता. पोलिसांनी हा माल नष्ट करून पाच जणांवर कारवाई केली आहे. ही कारवाई अमरावतीचे एसपी अविनाश बारगळ, अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत सातव यांच्या मार्गदर्शनात एसडीपीओ अतुल नवगिरे, एपीआय धोंडगे, एपीआय पंकज दाभाडे, एपीआय प्रशांत गित्ते व पथकाने केली आहे.

बातम्या आणखी आहेत...