आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती:अन् दुचाकीस्वारांनी पोलिस पकडतील म्हणून हायवेलगत फेकली स्फोटके; पोलिसांनी अवैध दारू समजून केला होता पाठलाग

अमरावतीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • तिवसा परिसरात महामार्गालगत आढळलेल्या याच त्या स्फोटकांच्या कांड्या आणि डिटोनेटर.

मुंबईत मुकेश अंबानींच्या घराजवळ एका वाहनात स्फोटकांच्या कांड्या सापडल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. ते प्रकरण अद्याप शांत झाले नाही तोच बुधवारी रात्री दुचाकीस्वारांनी स्फोटकांच्या सुमारे चारशे कांड्या तिवसा येथे महामार्गालगत टाकून पळ काढला होता. या प्रकाराने सुरूवातीला काही वेळ पोलिसही चक्रावले होते. मात्र गुरुवारी (दि. १८) रात्री एलसीबीच्या पथकाने या प्रकरणात स्फोटक विक्री करणाऱ्याला पकडले. त्यावेळी नेमका हा प्रकार काय ते समोर आले आहे. बुधवारी तिवसा येथे संशयाच्या आधारे वाहतूक पोलिसांनी एका दुचाकीला संशयाच्या आधारे थांबवले असता दुचाकीस्वाराने पळ काढला आणि पोलिस पकडतील या भीतीने त्याने या स्फोटकांच्या कांड्या हायवे लगत फेकून पळ काढला होता.

सुमित अनिल सोनोने (२५, रा. सातरगाव, तिवसा) याला पोलिसांनी अटक केली आहे. तर दुचाकीवर स्फोटकांच्या कांड्या घेवून जाणारा अंकुश मोहन लांडगे हा अद्याप पसार आहे. स्फोटक विकत आणून त्याद्वारे विहीरींंमध्येे ब्लास्टींग करण्याचा सुमितचा व्यवसाय असून तसा परवाना त्याच्याकडे असल्याचे पोलिसांनी सांगितले. याचवेळी अंकुशचाही ब्लास्टींग करण्याचाच व्यवसाय आहे. दरम्यान, बुधवारी सायंकाळी अंकुशने सुमितकडून सातरगावातून २१४ जिलेटीन (सुमारे २५ किलो) व २०० डिटोनेटर घेतल्या व त्या प्लास्टिकच्या पोत्यात भरुन दुचाकीने आष्टीकडे घेवून जाण्यासाठी निघाला. वास्तविकता परवाना असला तरीही डिटोनेटर व जिलेटीन हे स्फोटकं असल्यामुळे त्यांच्या वाहतूकीबाबत योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. मात्र अंकुशने पोत्यात भरले आणि दुचाकीवर घेवून जात असताना तिवसा पेट्रोल पम्प चौक येथे तैनात वाहतूक पोलिसांना ते दिसले. पोलिसांना वाटले अवैध दारु असावी, म्हणून पोलिसांनी त्याला थांबण्याचा इशारा केला मात्र अंकुश थांबला नाही, त्याने अमरावतीच्या दिशेने दुचाकी दामटली. पोलिसांनी पाठलाग सुरू केला, त्याला वाटले आता पोलिस पकडतील म्हणून त्याने हा स्फोटकाचा साठा तिवसा शहरालगतच्या पंचवटीपासून काही अंतरावर महामार्गाच्या बाजूने एका विहिरीजवळ टाकून पळ काढला.

दरम्यान पाठलाग करणाऱ्या पोलिसांनी त्या पोत्यात पाहीले असता त्यांना दारू तर नाही मात्र जिलेटीन व डिटोनेटरच्या कांड्या आढळल्या. त्यांनी हा साठा ताब्यात घेवून याबाबत वरिष्ठांना माहीती दिली. मात्र स्फोटकांचा मोठ्या प्रमाणात साठा सापडल्यामुळे पोलिसांमध्येही चांगलीच खळबळ उडाली. दरम्यान, हे स्फोटकं कोणी व का टाकले, हे प्रश्न अनुत्तरीत होते. या प्रकरणात एलसीबीचे पीआय तपन कोल्हेे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय विजय गराड, एएसआय मुलचंद भांबुरकर, सुनिल केवतकर, बळवंत दाभने, मंगेश लकडे, चंद्रशेखर खंडारे, राहूल सोलव या पथकाने गुरुवारी सकाळपासून तपास सुरू केला. त्यांनी सातरगाव येथील सुमित सोनोनेला विचारपूस केली असता त्याने पोलिसांना सांगितले की, जिलेटीन व डिटोनेटर आपणच अंकुशला विक्री केल्या होत्या व त्याने पोलिसांच्या भीतीने रस्त्यालगत टाकून पळ काढला आहे. पोलिसांनी अंकुशचाही शोध घेतला मात्र शुक्रवारी दुपारपर्यंत तो सापडला नव्हता. या प्रकरणात तिवसा पोलिसांनी स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ कलम ५, ९ (ब) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

वर्धेतून आणली स्फोटके
पोलिसांनी सुमित सोनोनेला अटक केली असून त्याने ही स्फोटकं वर्धेतून राजू चौधरी याच्याकडून आणले असल्याचे सांगितले आहे. परवाना असेल तरीही स्फोटकांची वाहतूक करणे सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. मात्र या प्रकरणात तर अंकुश व त्याचा सहकारी दुचाकीवर प्लास्टिकच्या पोत्यात हे स्फोटक घेवून जात होते.

आणखी तिघांचा शोध सुरू
सुमारे २५ किलो जिलेटीन व अतिशय घातक २०० नग डिटोनेटर जप्त केले आहे. दुचाकीवरून या स्फोटकांची वाहतूक सुरू होती. या प्रकरणात एकाला अटक केली असून आणखी तिघांची नावे समोर आली आहेत. त्यांचाही शोध सुरू आहे. - रिता उईके, ठाणेदार, तिवसा.

बातम्या आणखी आहेत...