आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापोलिस कर्मचाऱ्यांना मारहाण करून शासकीय वाहनाची तोडफोड करणाऱ्या एका ३० वर्षीय आरोपीला न्यायालयाने दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. हा निर्णय जिल्हा न्यायाधिश (क्रमांक ३) आर. व्ही. ताम्हाणेकर यांच्या न्यायालयाने मंगळवारी (दि. १९) दिला आहे.
विधी सूत्रांनी दिलेल्या माहीतीनूसार, शेख इजाजोद्दिन शेख निजामोद्दिन (३०, रा. अलीम नगर, अमरावती) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. १७ जुलै २०२० रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या दरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथील मुख्य प्रवेशव्दाराजवळ ही घटना घडली होती. कोतवाली ठाण्याचे पोलिस हवालदार अशोक शंकरण बुंदेले (५५, रा. श्रीराम नगर, राठीनगर, अमरावती) हे घटनेच्या दिवशी जिल्हा सामान्य रुग्णालयातील पोलीस चौकीवर कर्तव्यावर हजर होते. दरम्यान एक व्यक्ती इर्विनच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोलीसांना मारहाण करीत आहे, अशी माहिती बुंदेले यांना मिळाली. त्यानुसार ते सहकारी पोलिस अंमलदार रुपेश खुरकटे यांच्यासोबत मुख्य प्रवेशव्दाराजवळ गेले असता, शेख इजाजोद्दिन शेख निजामोद्दिन हा पोलिस अंमलदार सागर चव्हाण यांना मारहाण करत असल्याचे दिसले. त्यामुळे बुंदेले यांनी शेख इजाजोद्दिन शेख निजामोद्दिनला ताब्यात घेतले. त्यावेळी शेख इजाजोद्दिन शेख निजामोद्दिन हा पोलिस रेकार्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे बुंदेले यांच्या लक्षात आले. त्यामुळे ते त्याला पोलीस चौकीमध्ये नेत असतानाच शेख इजाजोद्दीनने बुंदेले यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. तसेच तो बुंदेले यांच्या हातातुन सुटला, त्याने तेथे पडलेला दगड बुंदेले यांना फेकुन मारला. हा दगड बुंदेले यांना मांडीवर लागला व ते जखमी झाले. सदर घटनेनंतर सिटी कोतवाली पोलिसांचा ताफा घटनास्थळावर पोहोचला.
दरम्यान आरोपीने पोलिसांच्या वाहनावर दगड मारून नुकसान केले व उपस्थित सर्वांना मारण्याची धमकी दिली. सदर घटनेची तक्रार पोलिस हवालदार अशोक बुंदेले यांनी कोतवाली ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी शेख इजाजोद्दीन शेख निजामोद्दीन याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरीक्त सरकारी वकील रणजीत भेटाळू यांनी यशस्वीरित्या युक्तीवाद केला. या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून कोतवाली पोलिस ठाण्यातील पीएसआय राजेंद्र गुलतकर यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरीक्त सरकारी वकील यांनी एकुण सात साक्षीदार तपासले. फिर्यादी व इतर साक्षीदारांची साक्ष तसेच अतिरिक्त सरकारी वकील रणजीत भेटाळू यांचा युक्तीवाद ग्राहय धरुन जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्रमांक ३) रविंद्र व्ही. ताम्हाणेकर यांनी आरोपीला दोषी ठरवित २ वर्षे सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंडांची शिक्षा सुनावली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.