आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदार नोंदणीसाठी मुदतवाढ:संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अधिसभा निवडणुकीची अधिसूचना जारी, आता 10 ऑगस्टपर्यंत संधी

अमरावती6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अधिसभा (सिनेट) निवडणुकीसाठी मतदार नोंदणीला पुन्हा १० दिवस अर्थात १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी आज त्याबाबतची अधिसूचना जारी केली. मतदार नोंदणीची पूर्वीची मुदत आज तीस जुलै रोजी संपुष्टात आली होती. त्यामुळे ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

पूरस्थितीमुळे मुदतवाढ

पूर्वीच्या वेळापत्रकानुसार मतदार यादीत नावे नोंदविण्याची शेवटची तारीख ३० जुलै होती. परंतु वातावरणातील बदल, काही जिल्ह्यांमध्ये सुरु असलेला सततचा पाऊस व पूरस्थितीमुळे अनेकांना नावे नोंदविता आली नाहीत, असे काही विद्यार्थी व प्राध्यापकांच्या संघटनांचे म्हणणे होते. त्यामुळे सिनेटच्या मतदार नोंदणीला मुदतवाढ दिली जावी, अशी या संघटनांची मागणी होती. त्याला अनुसरुन विद्यापीठाने हे पाऊल उचलले आहे.

मतदार नोंदणीसाठी शेवटची संधी

आता पदवीधर मतदार म्हणून ज्यांची नोंदणी राहिली असेल, त्यांना ती करता येईल. मतदार नोंदणीसाठी ही शेवटची संधी असून यानंतर कुठल्याही परिस्थितीत मुदतवाढ दिली जाणार नाही, असे विद्यापीठाने सांगितले आहे. पूर्वीच्या सूचनेनुसार ऑनलाईन मतदार नोंदणी केल्यानंतर त्याबाबतची प्रिंटआऊट (हार्डकॉपी) विद्यापीठात सादर करण्याची सूचना देण्यात आली होती. मात्र आता त्या प्रिंटआऊटची आवश्यकता नाही, असेही विद्यापीठाने कळवले आहे. विद्यापीठाच्या सिनेटचा कार्यकाळ पुढील महिण्यात संपुष्टात येत आहे. त्यामुळे तत्पूर्वीच निवडणुका घेऊन नवी कार्यकारिणी अस्तित्वात आणण्यासाठी विद्यापीठाने निवडणूक प्रक्रिया सुरु केली आहे. अधिक माहितीसाठी उपकुलसचिव प्रमोद तालन (९९२२९९३२७३), सहा. कुलसचिव आर.जे. सयाम (९४२३६४९३४६) व अधीक्षक उमेश लांडगे (९४२१७८५२५८) यांच्याशी संपर्क साधता येईल, असे विद्यापीठाच्यावतीने कळवण्यात आले आहे.

5 जिल्ह्यांत मतदार सहायता केंद्र

मतदार नोंदणीसाठी पाचही जिल्ह्यांत सहायता केंद्र स्थापन करण्यात आले आहे. यामध्ये जगदंब महाविद्यालय अचलपूर, श्री वसंतराव नाईक महाविद्यालय धारणी, श्री राधाकिसन लक्ष्मीनारायण तोष्णीवाल विज्ञान महाविद्यालय अकोला, लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी, लोकनायक बापुजी अणे महिला महाविद्यालय मेहकर, जी.एस. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय खामगांव, एम.ई.एस. कला व वाणिज्य महाविद्यालय मेहकर, पंकज लड्ढा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅन्ड मॅनेजमेंट स्टडीज बुलढाणा, पद्मश्री डॉ. व्ही.बी. कोलते कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मलकापूर, उत्तमनंद बगडीया कला व वाणिज्य महाविद्यालय रिसोड, सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय वाशिम व बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालय पुसद या महाविद्यालयांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...