आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजय:विद्यापीठ सिनेट मतमोजणी; प्राचार्य संवर्गात गवई, वैद्य, कुलट, नागरे यांचा विजय

अमरावती4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत प्राचार्य आणि विद्यापीठ शिक्षक मतदार संघाचे निकाल हाती आले असून, प्राचार्य संवर्गात सुभाष गवई (६५), डॉ. अनुराधा वैद्य (६४), विजय नागरे (७४) व अंबादास कुलट (७३) विजयी झाले आहेत. या मतदारसंघात एकूण ११९ मतदार होते. त्यापैकी ११७ जणांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला. कोटा ५८ मतांचा होता.

दुसरीकडे तीन शिक्षक मतदार संघात डॉ. जागृती बारब्दे (३५) व डाॅ. संदीप वाघुळे (३३) विजयी झाले. या मतदार संघात एकूण ५८ मतदार होते. त्यापैकी ५७ मतदारांनी मतदानात भाग घेतला. कोटा २९ चा होता.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट), विद्वत परिषद (अॅकडेमिक कौन्सील) व अभ्यास मंडळांच्या (बीओएस) निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी सकाळी ८ वाजता सुरू झाली होती. रात्री सव्वा बारा वाजताच्या सुमारास वरील निकाल हाती आले. त्यामुळे संपर्ण निकाल हाती येण्यासाठी बुधवार सकाळ उजाडण्याची शक्यता वर्तवण्यात आली.

विद्यापीठाचा वनस्पतिशास्त्र विभागातील सहा आणि ज्ञानस्रोत केंद्राच्या अभ्यासिकेतील दाेन अशा आठ टेबलवर ही व्यवस्था केली होती. मतमाेजणीसाठी ४० पेक्षा अधिक महिला कर्मचारी असून आठ गटांमध्ये ५९ कर्मचारी मतमोजणी करत आहेत. सर्व मतपत्रिकांची पडताळणी, त्यातील वैध-अवैध मतपत्रिकांचे विलगीकरण, मतपत्रिकांचे गठ्ठे तयार करणे, विजयी होण्यासाठीचा ‘कोटा’ ठरवणे आदी प्रक्रियांमुळे वेळ लागत आहे. दरम्यान ज्या मतदारसंघात मतदारांची संख्या कमी आहे, तेथील निकाल लवकर घोषित होणार असून नोंदणीकृत पदवीधर आणि प्राध्यापक मतदारसंघातील मतदार व उमेदवारांची संख्या जास्त असल्याने शेवटचा निकाल घोषित होण्यासाठी २३ नोव्हेंबरची प्रतीक्षा करावी लागेल, असा विद्यापीठ प्रशासनाचा अंदाज आहे. सर्व ६३ मतदान केंद्रावरील सीलबंद मतपेट्या रविवारी मध्यरात्रीनंतर विद्यापीठात पोहोचल्या. सकाळी ८ वाजेपासून त्या मतपेट्या उघडून मतपत्रिकांचा हिशेब जुळवण्याचे काम सुरू होते. यासाठी स्वतंत्र चार गट केले होते.

४३ मतदारसंघांसाठी झाली निवडणूक
सिनेटच्या ३६, विद्वत परिषदेच्या ६ आणि एक अभ्यास मंडळ अशा ४३ मतदारसंघांसाठी ही निवडणूक पार पडली. सिनेटमध्ये नोंदणीकृत पदवीधरांना निवडून देण्यासाठी ४५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून, प्राचार्य, प्राध्यापक, बीओएस व शिक्षण संस्थांचे पदाधिकारी या चार मतदारसंघांमध्ये सुमारे ९५ टक्के मतदान झाल्याचे विद्यापीठ प्रशासनाचे म्हणणे आहे. ही निवडणूक पसंतिक्रमावर आधारित असल्याने यामध्ये मतपत्रिकेचा वापर केला. त्यामुळे मतमोजणीला भरपूर कालावधी लागेल, असे निवडणूक यंत्रणेचे म्हणणे आहे.

बातम्या आणखी आहेत...