आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ध्वजारोहण:‘विद्यार्थीकेंद्रीत प्रगतीकडे विद्यापीठाचे लक्ष, त्यांची स्वप्ने आम्ही पूर्ण करु’

अमरावती4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत असताना देशाने सर्वच क्षेत्रात प्रगती केली आहे. त्यानुसार विद्यापीठाची विद्यार्थी केंद्रीत प्रगती आम्ही करीत आहोत. विद्यार्थ्यांचे स्वप्न आम्ही पूर्ण करणार आहोत. त्याकरिता अभ्यासक्रमातील बदल, कौशल्याधिष्ठित शिक्षण, सी.बी.सी.एस.च्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल. भविष्यात ते उद्योजक होतील, असा आमचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांनी केले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांचे हस्ते राष्ट्र ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. प्र-कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजीव बोरकर व क्रीडा तथा शारीरिक शिक्षण संचालक डॉ. अविनाश असनारे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.कुलगुरु म्हणाले, क्रीडा, राष्ट्रीय सेवा योजना, सांस्कृतिक क्षेत्रात आमच्या विद्यार्थ्यांची उज्वल कामगिरी राहिली आहे.

उच्चतम कामगिरीसाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य व मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करणार आहोत. सत्तावीस दिवसात परीक्षांचे निकाल लावण्याचा विक्रम विद्यापीठाने केला आहे. तंत्रज्ञानाचा जास्तीतजास्त उपयोग विद्यापीठाच्या प्रशासकीय कामात होत आहे. विद्यार्थी हितार्थ अनेक उपक्रम विद्यापीठाने राबवले असून संशोधन वाढवण्यावर आमचा भर आहे. विद्यापीठाला २४० शिक्षकांची आवश्यकता असताना सद्यःस्थितीत साठ-बासष्ठ शिक्षकांमध्ये संशोधन व पेटंटचे कार्य आम्ही पुढे नेत आहोत. दोनशे सी.एच.बी. शिक्षक कार्यरत असून त्यांना नुकतेच प्रशिक्षण देण्यात आले. संचालन क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. अविनाश असनारे यांनी केले.

स्वातंत्र्य दिन कार्यक्रमाला व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. दिनेश सूर्यवंशी, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. हेमंत देशमुख, प्रभारी वित्त व लेखा अधिकारी डॉ. नितीन कोळी, ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. मोहन खेरडे, आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील, रासेयो संचालक डॉ. राजेश बुरंगे, एच.आर.डी.सी. चे संचालक डॉ. प्रसाद वाडेगांवकर, आय.आय.एल. च्या संचालक डॉ. स्वाती शेरेकर, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता डॉ. संजय डुडूल, डॉ. वैशाली गुडधे, डॉ. मोना चिमोटे तसेच शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...