आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरी सुविधांसाठी 20 तारखेला लक्षवेध आंदोलन:विद्यापीठ परिसरातील नागरिक आक्रमक; निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठासमोरून जुन्या रहाटगाव रस्त्याला जो़डून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 चा वळण मार्ग (नवीन बायपास) आहे. या नव्या मार्गामुळे जुना महसुली रस्ता अडगळीत पडला आहे. मुळात या भागातील वेगवेगळ्या 14 कॉलनी व वसाहतींमधील नागरिकांच्या दळवळणासाठी तोच एकमेव मार्ग आहे. त्यामुळे त्याच्या दुरुस्ती व ‌वस्त्यांमधील इतर नागरी समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी तेथील नागरिकांनी आगामी 20 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता विद्यापीठ चौकात लक्षवेध आंदोलन करण्याचे ठरविले आहे. या आंदोलनानंतरही मनपा प्रशासनाने दखल घेतली नाही तर भविष्यात मनपा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घातला जाईल, असा नागरिकांचा संकल्प आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर विद्यापीठ चौकात उड्डाणपूल (ओवर ब्रिज) आहे. दुसऱ्या बाजूने रहाटगाव पर्यंत ना रस्ता, ना लाईट, ना पाऊलवाट अशी स्थिती आहे. त्यामुळे या वस्त्यांमधील नागरिकांना अक्षरशः कोंडून ठेवले आहे. शिवाय वस्त्यांमधील अंतर्गत रस्ते, नाल्यांचाही विकास झाला नाही. केवळ मनपा कर वसुलीचे काम करते. सुचवलेली कामे मात्र प्रलंबित आहेत. यावरून मनपाचा या भागासाठी विकास आराखडाच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे यंत्रणेविरोधात हे आंदोलन केले जात आहे. आंदोलनासाठी कर्मयोगी गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीचा दिवस मुद्दामहून निवडला, असे नागरी कृती समितीचे म्हणणे असून या आंदोलनाची पूर्वसूचना मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.

आंदोलनाच्या प्रारंभी संत गाडगेबाबांना विनम्र अभिवादन करून आदरांजली दिली जाईल. त्यानंतर सर्व चौदाही वस्त्यांमधील नागरिकांच्या सहभागाने शांततेच्या मार्गाने लक्षवेध आंदोलन केले जाईल. या आंदोलनात तेथील रहिवासी प्रा. डॉ. ओमप्रकाश कुटेमाटे, जगदीश आत्राम, अमित गावंडे, राजेश इंगळेकर, गोपाळराव वर्धे, संजय अगमे, संतोष भाकरे, अशोकराव सोनारकर, बाळासाहेब गावंडे, निलेश चौधरी, सुंदरलाल बुंदेले, रोशन कुटेमाटे, ऍड. शरद ढोके, मंगेश वाहने, अशोकराव वानखडे, कवीश बागेकर, महादेवराव लोखंडे आदी सहभागी होणार असून इतरांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

वस्त्या आहेत, पण नागरी सुविधा नाहीत

अलिकडच्या काळात बायपास लगतच्या परिसरात झपाट्याने निवासी वस्त्या तयार झाल्या. मधुबन कॉलनी ते अजमिरे लेआऊटच्या मध्ये तब्बल 14 वस्त्या आहेत. या परिसरामध्ये विद्यापीठात शिकणाऱ्या मुला- मुलींसह, मार्डी रोडवरील सर्व संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रामुख्याने वास्तव्य आहे. रात्री उशिरापर्यंत या मार्गावर ये-जा सुरु असते. त्या रस्त्यावर पक्की सडक बांधण्यात आली नाही, पथदिवे उभारणीही अर्ध्यावर आहे. त्यामुळे नागरिक परेशान झाले आहेत. अंधाराचे साम्राज्य असल्यामुळे जुन्या बायपास टोल नाक्याजवळच्या विहिरीमध्ये शितल पाटील यांचे हत्याकांड घडले होते.

बातम्या आणखी आहेत...