आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामागील दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला आहे. वातावरणातील या बदलामुळे शहरासह ग्रामीण भागात लहान मुलांमध्ये व्हायरल इन्फेक्शन झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शासकीय व खासगी दवाखान्यामध्ये बाल रुग्णांची गर्दी दिसून येत आहे. हा थंडीच्या कडाक्याचा परिणाम असून मुलांची योग्य काळजी घेण्याचा सल्ला पालकांना दिला आहे.
मागील दोन तीन दिवसांत वातावरणातील पारा अचानक खाली घसरल्याने थंडीचे प्रमाण वाढले. त्यामुळे लहान मुले सर्दी, खोकला व तापाच्या विळख्यात सापडली आहेत. ज्या मुलांची रोग प्रतिकारक शक्ती कमी अाहे, ती वारंवार आजारी पडत असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली. अशा वातावरणामध्ये पालकांनी मुलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्यासह त्यांची रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी मुलांना सकस आहार देण्याचा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे.
वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकल्यासह बाळदमा व न्युमोनियाच्या रुग्णांमध्येही वाढ झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. दरम्यान,वातावरण बदलामुळे उत्पन्न होणाऱ्या तक्रारी आणि गोवरची काही लक्षणे सारखी असल्याने पालकांनी मुलांच्या आरोग्याबाबत सतर्कता बाळगावी, असे आवाहन बालरोगतज्ञांच्या वतीने करण्यात येत आहे. खास करून ज्या मुलांमध्ये तापीसह अंगावर पुरळ दिसून येत आहे, अशा मुलांबाबत तत्काळ वैद्यकीय सल्ला घेऊन डॉक्टरांच्या मार्गदर्शनात उपचार करावे.
आरोग्यासह मुलांच्या आहाराकडे लक्ष द्या
ऋतुमानाचे बदलते चित्र लहान मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. त्यामुळे त्यांना स्वच्छ व पूर्ण शरीर झाकेल, असे कपडे घालावेत त्यांच्या आहार व विहाराची योग्य ती काळजी पालकांनी घ्यावी. डॉ. श्रीनिकेत तिडके, बालरोग तज्ज्ञ.
मुलांच्या आरोग्याची योग्य काळजी घ्या
वातावरणातील बदलामुळे लहान मुलांमध्ये बालदमा, न्युमोनिया आदी आजारही बळावत असल्याचे दिसून येत आहे. डेंग्युचे प्रमाण कमी असले, तरी पालकांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.-डॉ. प्रतिभा काळे, बालरोग तज्ज्ञ.
लहान मुलांना परस्पर औषधे देऊ नका
लहान मुलांना परस्पर औषधे देण्याची जोखीम पालकांनी घेऊ नये. डायरियामुळे जुलाब झाल्यास ओआरएस वगळता इतर औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय देऊ नये. ओआरएस घेतल्याने रुग्णास फायदा होतो. शरीरातील खनिज आणि पाण्याची कमतरता भरून निघते. याशिवाय मीठ आणि साखरेचं पाणी घेतल्यासही फायदा होता. यामुळे अशक्तपणा कमी होतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.