आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील विधिमंत्र छायाचित्र प्रतिष्ठान आणि शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेच्या (आधीचे व्हीएमव्ही) संयुक्त विद्यमाने आज, रविवारी पहाटे आयोजित करण्यात आलेल्या शहरातील पहिल्या 'आर्किटेक्चर फोटोवाॅक' मुळे शंभरी गाठलेल्या व्हीएमव्हीच्या इमारतीचे अनेक सुंदर कंगोरे समोर आले. या उपक्रमाला विद्यार्थी, शिक्षक व नवोदित छायाचित्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
संस्थेचा विस्तीर्ण परिसर, ब्रिटीशकालीन स्थापत्यकलेतील भव्यता, १०० वर्षांनंतर आजही भक्कमपणे उभ्या असलेल्या संस्थेच्या चिरेबंदी विविध इमारती तसेच संचालकांच्या विशेष प्रयत्नांनी फुलविण्यात आलेली बाग आदी बाबी छायाचित्रकारांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केल्या. संस्थेचा परिसर विस्तीर्ण असल्यामुळे या उपक्रमात सहभागी सर्व जुन्या-नव्या छायाचित्रकारांना छायाचित्रणाचा मनमुराद आनंद घेता आला.
अमरावतीसारख्या ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न नगरीत १९२३ साली ‘किंग एडवर्ड कॉलेज’ या नावाने तत्कालीन ब्रिटीश शासनाने या महाविद्यालयाची स्थापना केली होती. स्वातंत्र्यानंतर याचे नामकरण ‘विदर्भ महाविद्यालय’ असे करण्यात आले. पुढे सन २००१ मध्ये त्याची श्रेणीवाढ करून संस्थेला ‘शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था’ असे नामाभिदान देण्यात आले. तर सन २०२१ मध्ये या संस्थेला विद्यापीठासारखीच स्वायत्तता देण्यात आली. चालू वर्ष २०२३ हे संस्थेचे शताब्दी वर्ष आहे. त्याचेच औचित्य साधून विधिमंत्र छायाचित्र प्रतिष्ठान व महाविद्यालयातर्फे या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यापूर्वी केले होते परकोटाचे छायाचित्रण
या उपक्रमाला प्रतिसाद दिल्याबद्दल विधिमंत्रचे देवव्रत कुळकर्णी व महाविद्यालयाच्या संचालिका प्रा.डाॅ. अंजली देशमुख व प्रा.डाॅ. वैभव ठाकरे, ज्येष्ठ छायाचित्रकार वैभव दलाल यांनी सर्व छायाचित्रकारांचे आभार मानले आहेत. या फोटोवॉकमध्ये विद्यार्थी, शिक्षक, नवोदित छायाचित्रकार आदींनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला. यापूर्वी महापालिकेच्या सौजन्याने शहरातील ऐतिहासिक परकोटाचे (जुन्या शहराची संरक्षण भिंत) छायाचित्रण करण्यात आले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.