आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौंदर्य:20 कोटी रुपये खर्चून वडाळी तलाव, उद्यान, पार्कचे सौंदर्य वाढवणार

वैभव चिंचाळकर | अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात मोजकीच पर्यटन स्थळे असून, त्यात प्रामुख्याने वडाळी व छत्री तलावाचा समावेश आहे. छत्री तलाव सौंदर्यीकरणाचे काम सुरू झाले असून आता वडाळी तलावाच्या सौंदर्यीकरणाचे कामही अमृत सरोवर भाग २ योजनेंतर्गत २० कोटी रुपये खर्च करून केले जाणार असून मनपाद्वारे यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

बांबू गार्डन, वडाळी उद्यान व वडाळी तलाव ही तिन्ही प्रेक्षणीय ठिकाणे जवळ असल्यामुळे वडाळी तलावातील शुद्ध पाण्याचा तिन्हीसाठी उत्तम वापर करता येणार आहे. तलावात ज्या भागातून पाणी येत नाही, त्या भागात दगडी भिंत तयार केली जाणार आहे.

एवढेच नव्हे तर संपूर्ण उद्यान, खेळण्यांचेही नूतनीकरण केले जाईल. यासोबतच वडाळी तलावाभोवती फिरण्यासाठी पाथ वेची साेय केली जाणार असून, हा परिसर आणखी देखणा बनवण्यासाठी नारळाची झाडे लावली जाणार आहेत. याशिवाय उद्यानाच्या आत नागरिकांच्या स्मरणात राहतील अशी लहान-लहान सौंदर्य स्थळे, सेल्फी पाॅइंट, मेमोरेबल बाॅडीज तयार करून उद्यानाचे सौंदर्य आणखी खुलवले जाणार आहे. यासोबतच प्रशस्त वाहनतळांसह परिसराचा विकास केला जाणार आहे. यासंदर्भात मनपा आयुक्तांच्या पुढाकाराने अंतिम प्लॅनही तयार झाला असून, लवकरच त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे.

संगीत कारंजेही ठरणार पर्यटकांचे आकर्षण
वडाळी तलाव हा पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरावे, यासाठी संगीत कारंजे तलावात लावले जाणार आहेत. त्यामुळे वडाळी तलावाचे सौंदर्य खुलण्यासोबतच सहलीसाठी एक नयनरम्य स्थळ शहरवासीयांना उपलब्ध होईल. यासह खुले योगभवन, अल्पोपहारगृह, ग्रीन जिम, ज्येष्ठांसह मुलांसाठी खेळण्यांचा पार्क आकाराला येणार आहे.

बांबू गार्डनचे आणखी महत्त्व वाढणार
वडाळी तलावाला लागूनच बांबू गार्डन हे देशातील विविध प्रजातींच्या बांबूंची लागवड करण्यात आलेले उद्यान वडाळी पर्यटन स्थळ म्हणून आणखी नावारूपाला येणार असून, या गार्डनचे महत्त्वही वाढणार आहे. कारण तलावातील पाणी बांबू गार्डनला मिळेल.

गाळ काढून तलावाचे पाणी शुद्ध करणार
वडाळी तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून, या ठिकाणी वनस्पतीही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. सर्वप्रथम गाळ आणि वनस्पती काढल्या जातील. त्यानंतर पर्यावरणाच्या दृष्टीने तांत्रिक पद्धतीने पाण्याचे शुद्धीकरण केले जाईल. त्यामुळे परिसरात शुद्धता वाढणार असल्याची माहिती उप-अभियंता राजेश आगरकर यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...