आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 तास वाहतूक ठप्प:कौंडण्यपूर येथील नदीच्या पुरामुळे वर्धा-अमरावती जिल्ह्याचा संपर्क तुटला

अमरावती6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अप्पर वर्धा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने अमरावती जिल्ह्याच्या सीमेवरील श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथील दोन जिल्ह्याला जोडणारा पूल पाण्याखाली गेल्याने दोन जिल्ह्यांचा संपर्क तुटला. त्यामुळे सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत म्हणजेच तब्बल चार तास वाहतूक बंद होती. तसेच नदी काठावरील गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तत्पूर्वी, पाण्याची पातळी कमी झाल्याने वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे नद्या, तलाव, प्रकल्प पावसाच्या पाण्यामुळे तुडूंब भरले आहे. यामध्ये जिल्ह्यातील अप्पर वर्धा प्रकल्पाचाही समावेश आहे. प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने गत वर्षीच्या तुलनेत धरण यंदा वेळेपूर्वीच भरले आहे. त्यामुळे शनिवारी रात्री उशिरा धरणाचे १३ ही गेट खुले करण्यात आले आहे.

१३ ही दरवाजे २०० सेंमी.वर उचलले आहेत. त्यामुळे सद्यःस्थितीत या धरणातून ४१७७ क्युसेकचा विसर्ग सुरू होता. त्यामुळे वर्धा नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. या पुरामुळे श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथील पूल पाण्याखाली गेला. या पुलावरून २ फूट पाणी वाहत होते. त्यामुळे अमरावतीवरून (वर्धा) आर्वीकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. या वेळी दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तसेच नदीला आलेला पूर बघण्यासाठी दोन्ही बाजूकडे नागरिकांनी गर्दी होती.

उर्ध्व वर्धा धरणाचे १३ दरवाजे उघडले : उर्ध्व वर्धा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने रविवारी रात्री ८ वाजता ऊर्ध्व वर्धा प्रकल्पाचा विसर्ग १२५६ घनमीटर प्रतिसेकंदवरून १४७४ घनमीटर प्रतिसेकंद करण्यात येणार आहे. १३ दरवाजे प्रत्येकी ८० सें.मी.ने उघडले आहेत, अशी माहिती जलसंपदा विभागाकडून मिळाली आहे.

दोन्ही बाजूंनी पोलिसांचा बंदोबस्त
पुलावरून पाणी वाहत असल्याने कोणीही पाण्यातून वाहतूक करणार नाही, याची खबरदारी म्हणून कुऱ्हा पोलिस स्टेशन ठाणेदार संदीप बिरांजे ताफ्यासह उपस्थित होते. यामध्ये जमादार अनिल निंघोट, पोकाँ हेमंत डहाके, वाहतूक पोकाँ सागर निमकर, योगेश नेवारे, कौंडण्यपूर तंटामुक्त अध्यक्ष अंकुश देऊळकर, उपसरपंच श्रीराम केवदे, ग्रा.पं.कर्मचारी ठाकरे, राजेंद्र सवाळे आदींनी सहकार्य केले. तर दुसरीकडे आर्वी पोलिस स्टेशनचे सतीश जांभुळकर, पोकाँ नागनाथ कुंडगीर यांनी देऊरवाडा येथे बंदोबस्त ठेवला होता.

वरूड बगाजी प्रकल्प झाल्याने वर्धा नदी दुथडी
पावसाळ्याच्या दिवसात नदीच्या पुलावरून पाणी जाते. अप्पर वर्धा धारणासोबतच वरूड बगाजी प्रकल्प झाल्याने वर्धा नदी दुथडी भरलेली असते. त्यामुळे धरणातील पाणी सोडल्याने पुलावरून पाणी वाहते. त्यामुळे दोन्ही जिल्ह्याचा संपर्क तुटतो. या वेळी कोणतीही जीवितहानी होऊ नये, यासाठी पोलिस प्रशासन व ग्रामपंचायत प्रशासन सतर्क असते. -अंकुश देऊळकर, अध्यक्ष, तंटामुक्ती, कौंडण्यपूर.

बातम्या आणखी आहेत...