आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते पिल्याने मनुष्य गुरगुरतो’,असे म्हणत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्त्व विशद केले आहे. शिक्षण घेण्यासाठी वयाची कोणतीही मर्यादा नसते. मनुष्य प्राणी हा आयुष्यभर विद्यार्थी असतो, असे म्हटले जाते. याच विचारांवर चालत अनेकांनी स्वतः ला आयुष्यभर विद्यार्थी दशेत ठेवत शिक्षणाचे वय संपल्यानंतरही अनेक पदव्या घेतल्याचे उदाहरण आपण समाजात पाहत असतो. अशीच अनुभूती तालुक्यातील तोंगलाबाद येथे आली. लग्नामुळे अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याचा संकल्प केलेल्या लक्ष्मी बीजवडे यांनी संसार सांभाळून १६ वर्षांनंतर बारावीची परीक्षा देत ती प्रथम श्रेणीत उत्तीर्णदेखील केली.
दर्यापूर तालुक्यातील तोंगलाबाद येथील लक्ष्मीताई बीजवाडे (कट्यारमल) यांनी आपला १६ वर्षांचा संसार सांभाळून लग्नामुळे अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याचा संकल्प केला. केवळ संकल्प करून त्या थांबल्या नाहीत, तर त्यासाठी त्यांनी प्रबोधन विद्यालयात एमसीव्हीसी शाखेत प्रवेश घेतला. त्यांनी चिकाटी व मेहनतीने अभ्यास करून जिद्दीने यश मिळवले. नुकत्याच लागलेल्या बारावीच्या निकालात त्यांनी ६५ टक्के गुण प्राप्त करून प्रथम श्रेणी मिळवली.
लग्नानंतर आपण कोणती तरी नोकरी करावी, ही इच्छा लक्ष्मी बीजवाडे यांनी उराशी बाळगली होती, परंतु त्यासाठी आपले शिक्षण कमी पडते, असे त्याच्या लक्षात आले. तेव्हापासून आपण आता पुन्हा शिकायला पाहिजे या विचाराने खाल्लेली उचल त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यासाठी त्यांना पतीची पण मोलाची साथ मिळाली. त्यांना १५ वर्षाचा मुलगा असून तो इयत्ता नववीत शिकतो. त्यांचे पती सामाजिक कार्यकर्ते असून गावात किराणा दुकान चालवतात. त्या स्वतः दर्यापूर पंचायत समिती अंतर्गत गावात त्या बचत गटाचे व जिजाऊ प्रतिष्ठानचे कार्य करतात. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान, शिक्षणासाठी वयाची अट नसते, इच्छा असली की शिक्षणासाठी मार्ग सापडतो, असे या लक्षमी नामक महिलेच्या या शैक्षणिक प्रवासातून सिद्ध झाले.
सत्कार अन् कौतुक
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांद्वारे घेण्यात आलेली बारावीची परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल लक्ष्मी बीजवाडे यांचे तोंगलाबादच्या सरपंच वैशाली पानझाडे, सोबत सामाजिक कार्यकर्ते धनंजय देशमुख, केशव बीजवाडे, नमन पानझाडे आदींनी त्यांचा सन्मान केला आहे. त्यांची शैक्षणिक जिद्द, चिकाटी याबद्दल समाजाच्या सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.