आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामित्राचा वाढदिवस असल्यामुळे रात्रीच्या वेळी तलवार हातात घेऊन केक कट करण्याच्या बेतात असणाऱ्यांना हा वाढदिवस चांगलाच अंगलट आला. शहरातील विलास नगर गल्ली क्रमांक ४ मध्ये हा वाढदिवस २ एप्रिलला रात्री साजरा होणार होता. मात्र गाडगेनगर पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तिघांना पकडले. यावेळी ‘बर्थ डे’ बॉय मात्र पसार झाला. राज खान ऊर्फ मो. अयुबी खान (१९), मो. रेहान मो. नईम (१९, दोघेही रा. गवळीपुरा) आणि कुलदीप नेमीचंद भुसाटे (२१, रा. विलासनगर) या तिघांना पोलिसांनी पकडले होते. याचवेळी सै. आदील सै. अकील (२०, रा. गवळीपुरा) हा पसार झाल्यामुळे पोलिसांच्या हातात आला नाही. सै. आदील याचा २ एप्रिलला रात्री बारा वाजता वाढदिवस साजरा करण्यात येणार होता. सै. आदील हा कुलदीपचा मित्र असल्यामुळे त्याच्या वाढदिवसाचा केक तलवारीने कट करण्याचा बेत त्यांनी आखला. कुलदीपच्या घराजवळ तलवारीने केक कट करण्याचे नियोजन केले. त्यासाठी तीन तलवारी सुद्धा त्यांनी आणल्या होत्या.
दरम्यान, केक कट करण्यापूर्वीच गाडगेनगर पोलिसांना ही माहिती मिळाली. त्यामुळे पोलिस पथक विलास नगरमध्ये पोहोचले. त्यावेळी पोलिसांना तिघे जण हातात तलवार घेऊन परिसरात फिरताना दिसले तसेच तलवारीने केक कट करण्याच्या तयारीत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. ही कारवाई पोलिस हवालदार ईशय खांडे व त्यांच्या पथकाने केली आहे. या प्रकरणी ईशय खांडे यांच्या तक्रारीवरून चौघांविरुद्ध अवैध शस्त्र बाळगणे या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.