आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टरांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार:इर्विनच्या नेत्ररुग्ण कक्षासमोर साचले पाणी, पाच वॉर्डांचा पाणी पुरवठा ठप्प

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाचा नेत्र रुग्ण कक्ष सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सदोष दुरुस्ती कार्यामुळे अडचणीत आला आहे. नुकतीच या विभागाने जलवाहिनीची दुरुस्ती केली. परंतु ती करताना गळती बंद न केल्यामुळे नेत्र रुग्ण विभागाच्या अगदी द्वारासमोर भला मोठा खड्डा पडला असून जलवाहिनीतील गळतीमुळे तो तुडूंब भरला आहे. तर दुसरीकडे एक दोन नव्हे तर नेत्र रुग्ण कक्षासह तब्बल पाच वाॅर्डांचा पाणी पुरवठा बंद झाला आहे.

या संदर्भात सदर कक्षाच्या प्रमुख डॉ. नम्रता सोनवणे यांनी प्रारंभी सदर विभागाकडे आणि तेथून प्रतिसाद न मिळाल्यामुळे जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार नोंदवून दुरुस्तीची मागणी केली. जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या कार्यालयाने देखील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र पाठवून तत्काळ दुरुस्ती करून देण्याची सूचना केली. परंतु त्यांनी पत्र पाठवून २० दिवस लोटल्यानंतरही प्रश्न तसाच कायम असून पाचही वाॅर्डांना पाण्याची पर्यायी व्यवस्था करून घ्यावी लागत आहे. यामध्ये रुग्णांचे प्रचंड हाल होत असून त्यांच्या नातेवाइकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.

दुसरीकडे सदोष दुरुस्ती आणि जलवाहिनीतील गळतीमुळे खड्ड्यात पाणी साचल्याने तेथे डास व इतर कीटकांचा प्रादुर्भाव वाढला आहे. ज्या खड्ड्यात पाणी साचले, त्या खड्ड्याला लागूनच एक खोली असून त्या खोलीचे दार अगदी खड्ड्यासमोर आहे. या खोलीत एसी आणि इतर उपकरणांना नियंत्रित करणारी यंत्रणा बसवली आहे. त्या यंत्रणेची देखभाल व दुरुस्ती किंवा वेळी-अवेळी उद्भवणाऱ्या अडचणीची सोडवणूक करण्यासाठी त्याच दाराचा वापर करावा लागतो. परंतु मध्येच खड्डा आडवा आल्याने त्या खोलीत शिरणेदेखील दुरापास्त झाले आहे. डॉ. सोनवणे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवलेल्या पत्रात या मुद्यांचा उल्लेख करत जलवाहिनीची दुरुस्ती व खड्डा लवकर बुजवण्याची मागणी केली आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.

बातम्या आणखी आहेत...