आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाईपलाईन फुटल्यामुळे चार दिवसांपूर्वी बंद झालेला अमरावती व बडनेरा शहराचा पाणी पुरवठा आज, बुधवार, ७ डिसेंबरला पूर्ववत झाला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने (मजीप्रा) अंदाज बांधल्यानुसार पाईपलाईनची दुरुस्ती ८ डिसेंबरला पुर्णत्वास जाणार होती. परंतु वेगाने काम केल्यामुळे दुरुस्तीकार्य रविवारी रात्रीच संपले. त्यानंतर उशीरा रात्री ट्रायल घेऊन मजीप्राने आज, बुधवारी पाण्याचा संचय केला. त्यामुळे दुपारपासून अमरावती-बडनेरा शहराच्या बहुतेक भागात पाणी सोडले गेले.
अमरावतीकरांना एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. त्यातही काही भागात सकाळी तर काही भागात सायंकाळी पाणी मिळते. गेल्या चार दिवसाआधी अचानक पाईपलाईन फुटल्याने सकाळी सुरु असलेला पाणी पुरवठा मध्येच बंद झाला होता. अचानक ओढवलेल्या या संकटामुळे सर्वांचाच जीव टांगणीला लागला होता. परंतु दुरुस्तीकार्य वेगाने पूर्ण करुन एक दिवसाआधीच पाणी पुरविल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला असून आनंद व्यक्त केला आहे.
मजीप्रा अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार सकाळचा पाणी पुरवठा ज्या भागात केला जातो, त्यांना दुपारनंतर काही प्रमाणात पाणी दिले गेले. तर संचय करुन ठेवलेले उर्वरित पाणी सायंकाळच्यावेळी सोडले गेले.
अमरावती व बडनेरावासियांना दिले जाणारे पिण्याचे पाणी मोर्शी तालुक्यातील सिंभोरा धरणातून आणले जाते. हे अंतर सुमारे ६५ किलोमीटर आहे. सदर पाईपलाईन ही दीड मीटर (अर्थात पाच फूट) व्यासाची असून ती कालबाह्य झाली आहे. तीचे आयुर्मान २५ वर्षांचे होते. त्यामुळे ती वारंवार फुटते. पाण्याच्या नेहमीच्या दाबामुळे ती अत्यंत जर्जर झाली असून ती पुर्णत: बदलणे हाच खरा व हुकमी पर्याय असल्याचे मजीप्राने शासनाला कळविले आहे. त्यासाठी पुढील २५ वर्षांची लोकसंख्या गृहीत धरुन दोन स्वतंत्र प्रस्तावही शासनाला पाठविले आहे. परंतु अमृत-दोनमध्ये बसणाऱ्या या प्रस्तावांपैकी नेमका कोणता मंजुर करावा, हे अद्यापही शासनाने ठरविले नाही. सध्या हे दोन्ही प्रस्ताव शासनाच्या उच्चाधिकारी समितीकडे निर्णयार्थ पाठविण्यात आले आहेत.
गेल्यावेळी अंदाज चुकला होता
गेल्यावेळी अर्थात जून २०२२ मध्ये मजीप्राने केलेल्या दाव्यानंतरही नागरिकांना पाणी मिळाले नव्हते. मुळात दुरुस्तीला लागणारा कालावधी वाढल्यामुळे पाणी एक दिवस उशीराने प्राप्त झाले होते. त्यामुळे नागरिक यावेळीही साशंक होते. दरम्यान मजीप्राने यावेळी केलेल्या दाव्याच्या एक दिवस आधीच पाणी पुरवठा केल्याने दोन्ही शहरांतील नागरिकांना आनंद होणे, स्वाभाविक आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.