आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा सामान्य रुग्णालयातील (इर्विन) पाण्याच्या टाकीला जोडलेली मुख्य जलवाहिनी फुटल्याने मागील पाच दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे. पाण्याशिवाय भागत नसल्याने रुग्णालयातील ३५० रुग्ण, नातेवाईक, कर्मचाऱ्यांची चांगलीच परवड होत आहे. बाटलीबंद पाणी विकत आणण्यासाठी गरीब रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना हकनाक आर्थिक फटका बसत आहे. रुग्णालयातील कर्मचारीही यामुळे चांगलेच त्रस्त झाले आहेत. शौचालयात जाण्यापुरतेही येथे पाणी नाही. खासगी टँकरने पाणीपुरवठा केला जात असला तरी तो अपुरा असल्यामुळे रुग्णांसह त्यांचे नातेवाईक रुग्णालय प्रशासनाच्या नावाने बोटे मोडत आहेत. जुन्या टाकीची जलवाहिनी नव्या पाण्याच्या टाकीला जोडण्यात आली. ती बदलण्यात आली नाही. त्यामुळे ही समस्या निर्माण झाल्याची माहिती दुरुस्ती करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दिली.
फारच जुनी जलवाहिनी जीर्ण झाल्याने फुटली इर्विन रुग्णालय निर्मितीपासूनची जलवाहिनी टाकण्यात आलेली जुनी व जीर्ण जलवाहिनी फुटल्यामुळे रुग्णालयाचा पाणी पुरवठाच ठप्प आहे. तरीही टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. लवकरच जलवाहिनी दुरुस्त होऊन, पाणीपुरवठा सुरळीत होईल. -नरेंद्र सोळंके, आरएमओ, इर्विन रुग्णालय., अमरावती.
३५० रुग्ण घेताहेत उपचार जिल्हा सामान्य (इर्विन) रुग्णालयात दैनंदिन शेकडो रुग्ण उपचार घेतात. परंतु, ३५० रुग्ण सध्या येथे उपचार घेत आहेत. प्रत्येक रुग्णांसोबत नातेवाइकही आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक दिलीप सौंदणे यांनी दिली. पाइपलाइन फुटल्याने या रुग्णांसह नातेवाइक पाण्याशिवाय त्रस्त आहेत.
बाहेरून आणावे लागत आहे पाणी टाकीत टँकरने पाणी टाकले जात आहे. परंतु, एवढ्या मोठ्या रुग्णालयासाठी ते पुरेसे नाही. लवकरच पाणी संपले. त्यानंतर आम्हाला बाहेरून पाणी आणावे लागले. संपूर्ण रुग्णालयात पाणी नसल्याने जेथे पाणी मिळेल, तेथे रुग्णांचे नातेवाइक धाव घेत आहेत. त्यामुळे रुग्णालय परिसरात सध्या बाटलीबंद पाण्याला मागणी वाढली आहे. काहीजण न्यू आझाद गणेशोत्सव मंडळातून पिण्याचे पाणी आणत आहेत, अशी माहिती रुग्णांच्या नातेवाइकाने दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.