आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअचलपूर-परतवाडा शहरातील नागरीकांना दहा दिवसांच्या प्रतिक्षेनंतर आज (दि. २९) अकराव्या दिवशी नगर पालिकेच्या माध्यमातून पाणी मिळाले आहे. देवगांव जलशुध्दीकरण केंद्रावरुन परतवाडा शहरात येणारी मुख्य जलवाहिनी १९ जुलैला सापन नदी पात्रात पाण्याच्या प्रवाहाने फुटल्याने जलपुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे शहरवासीयांना १० दिवस पाण्यासाठी वणवण फिरत प्रचंड त्रास सहन करावा लागला. अखेर महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाच्या तांत्रीक अनुभवामुळे व अचलपूर पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने जुळया शहरातील पाणीपुरवठा नियमित झाला.
नदीपात्रातील तुटलेली जलवाहिनी नदीच्या प्रवाहाने वाहून गेली असतानाही त्याच ठिकाणी जलवाहनी दुरुस्तीचे काम धरणाचे दरवाजे बंद करुन प्रारंभ करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. दरम्यान धरणाचे दरवाजे उघडताच नदीच्या प्रवाहात दुरुस्त केलेली जलवाहिनी पुन्हा वाहून गेली. दरम्यान ही जलीवाहिनी सापन नदीच्या पुलावरुन टाकणे योग्य ठरेल, असे मत मजीप्राने व्यक्त केल्यानंतर २४ जुलैला मजीप्राच्या मार्गदर्शनात जलवाहिनीचे काम प्रारंभ करण्यात आले. ही जलाहिनी जुनी व सरळ नसल्याने पुलावर पाईप टाकण्याकरीता माईल्ड स्टील पाईपचा पर्याय असतो. परंतु मजीप्राच्या अभियंत्यानी उपलब्ध असलेल्या ड्युक्टाईल आर्यन पाईपने सदर काम यशस्वी पूर्ण केले. याकरीता मजिप्राचे अभियंता सत्येन पाटील, बालाजी कंन्स्ट्रक्शनचे पंकज केदार, दत्तप्रसाद दावेदार, आकाश दाते, श्रेयस भालेराव, बालु पाटील, गोविंद सिंग, रामा गुजर, सागर रोडे, अंकुश वाघर्ते यांनी या कामाला पूर्ण केले. याचवेळी मुख्याधिकारी राजेंद्र फातले, अभियंता मिलींद वानखडे, मुन्शीराम पोटे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य महत्वपूर्ण ठरल्याने जुळया शहरातील जलपुरवठा सुरळीत झाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.