आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्यापासून अमरावती, बडनेरात पाणी पुरवठा पुन्हा 4 दिवस बंद!:तिसऱ्यांदा जलसंकट, 28 वर्ष जुनी पाईपलाईन बदलण्याची गरज

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जलवाहिनी फुटल्यामुळे आगामी 4 दिवस पाण्याविना घालविण्याची वेळ पुन्हा एकदा अमरावतीकरांवर ओढवली आहे. सरत्या वर्षांत तिसऱ्यांदा असा प्रकार घडला असून येत्या 8 डिसेंबरपर्यंत दुरुस्तीकार्य चालेल, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या (मजीप्रा) अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मजीप्राचे उपकार्यकारी अभियंता अजय लोखंडे यांनी तशी अधिकृत सूचना जारी केली असून दुरुस्तीकार्य सुरु झाल्याचेही म्हटले आहे.

आकस्मिकरित्या ओढवलेल्या या संकटामुळे अमरावती आणि बडनेरावासियांची झोप उडाली असून चार दिवस पाण्याविना कसे भागवायचे, असा त्यांचा प्रश्न आहे. हिवाळा ऋतुत पाण्याचा वापर फारसा होत नाही, हे खरे असले तरी 6 डिसेंबरचे विविध कार्यक्रम आणि त्यानिमित्त निर्माण झालेली अतिरिक्त पाण्याची गरज यामुळे सर्वांची चिंता वाढली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे सरत्या वर्षांतील हा तिसरा प्रसंग आहे. यापूर्वी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दोन वेळा असा प्रसंग ओढवला होता. परिणामी मनपा व खासगी यंत्रणांमार्फत पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर ओढवली होती.

आज, रविवारी सकाळी साडे अकरा ते बारा वाजताच्या दरम्यान बोरगाव फाट्यावरील ड्रीमलँड या मोठ्या कापडबाजारानजिक पाईपलाईन फुटली. सदर पाईपलाईन 28 वर्षे जुनी असून त्या काळातील पीएससी प्रकारातील आहे. त्यामुळे ती आतल्या आत घर्षणाने पातळ (थीन) झाली असून ज्याठिकाणी ती फारच पातळ झाली, त्या ठिकाणी फुटते. गेल्या दोन वेळचा अनुभव असाच होता. त्यामुळे मजीप्राने नवी पाईपलाईन लोखंडी करायचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असून आगामी 25 वर्षांची लोकसंख्या आधार मानून पाईपचा व्यासही दीडवरुन दोन मीटरपर्यंत वाढविला आहे.

यापूर्वी जूनच्या पहिल्या आठवड्यात पाईपलाईन फुटली होती. त्यामुळे 3 ते 5 जून या काळात पाणी पुरवठा बंद राहिला होता. परंतु दुरुस्तीकार्य पूर्ण झाल्याच्या दोन दिवसानंतर पुन्हा त्याच ठिकाणी पाईपलाईन फुटल्याने आठवडाभरासाठी पाणी पुरवठा बंद राहिला होता. त्यानंतर पाच महिन्याने पुन्हा तशीच वेळ ओढवली आहे.

ही पाईपलाईन ही दीड मीटर (अर्थात पाच फूट) व्यासाची असून ती 28 वर्षे जुनी आहे. तीचे आयुर्मान 25 वर्षांचे होते. त्यामुळे ती वारंवार फुटते. पाण्याच्या नेहमीच्या दाबामुळे ती अत्यंत जर्जर झाली असून ती पुर्णत: बदलणे हाच खरा व हुकमी पर्याय आहे.

बातम्या आणखी आहेत...