आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समस्या:हिंदू स्मशानभूमीतील गॅस दाहिनीवर अंत्यसंस्कारासाठी बघावी लागते वाट

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील प्रमुख हिंदू स्मशानभूमीत गॅस दाहिन्या उपलब्ध आहेत. त्या गॅस दाहिनीची क्षमता मात्र वाढली नाही. मात्र रोजच या दाहिनीवर दहाहून अधिक अंत्यसंस्कार केले जात असल्याने मृतांच्या नातेवाइकांना उशिरा रात्रीपर्यंत स्मशानात प्रतीक्षेत राहावे लागत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे मृतांच्या परि जनांना त्रास सहन करावा लागतो. ही समस्या लवकरच सोडवण्यासाठी सुधारणा करण्याची संपूर्ण तयारी स्मशानभूमीच्या नुकत्याच केलेल्या पाहणीदरम्यान मनपा आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी दर्शवली. स्मशानभूमीतील सर्व अडचणी सोडवण्यास प्राधान्य देण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. गॅस दाहिन्यांवर अंतिम संस्कार करण्यास एव्हाना मृताचे नातेवाइक प्राधान्य देत आहेत. त्यामुळे येथे गर्दी वाढली आहे. कोणालाही फार वेळ खोळंबून राहावे लागू नये, अशी उपाययोजना लवकरात लवकर केली जाईल, असेही मनपा आयुक्तांनी स्पष्ट केले. मनपा क्षेत्रातील महानगरपालिकेच्या स्मशानभूमींमध्ये मुलभूत सुविधा पुरवण्यावर मनपा आयुक्तांनी स्मशान भूमीचे पदाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. बर्निंग शेड, चौकीदाराची खोली, पाण्याची व्यवस्था, पाथवे, कंपाऊंड वॉल बाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. या पाहणी दरम्यान उपायुक्त डॉ.सीमा नैताम, हिंदू स्मशान संस्थेचे अध्यक्ष अॅड. रतनलाल अटल, अॅड.विजय लढ्ढा, शरद दातेराव, कार्यकारी अभियंता २ सुहास चव्हाण, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर, अभियंता अजय विंचुरकर उपस्थित होते. हिंदू स्मशान संस्थेचे योगदान हे फार मोठे असून, येथे अंतिम संस्काराची व्यवस्था चांगल्याप्रकारे केली जाते. या संस्थेला कोणतेही सहकार्य लागल्यास मनपा सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही मनपा आयुक्तांनी दिली. यावेळी अधिकाऱ्यांसोबत स्मशानभूमीच्या सद्याच्या स्थितीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शहरातील विविध भागातील स्मशानभूमी विकसित करण्यात येत असून एकाच भागातील स्मशानभूमीवर ताण येता कामा नये. यासाठी शहरात ज्या-ज्या ठिकाणी स्मशानभूमी आहेत, त्याचा विकास करून त्या ठिकाणी अंत्यविधी करण्यात येणार आहेत. त्या ठिकाणी स्मशानभूमी विकसित असून, या ठिकाणी लागणारे साहित्य उपलब्ध करून देण्याची सूचना यावेळी देण्यात आली.

देखभालीसाठी शहरातील स्मशानभूमी सार्वजनिक संस्थेला देणार : आयुक्त मनपा क्षेत्रातील महानगरपालिकेच्या स्मशानभूमी देखभाल व्यवस्थापनासाठी सार्वजनिक संस्थेस देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. तसेच शहरातील स्मशानभूमी टप्प्या-टप्प्याने निधीच्या उपलब्धतेनुसार विकसित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

लोकसहभागातून सुंदरस्मशान भूमीचे निर्माण कार्य कौतुकास्पद : आयुक्त लोकसहभागातून हिंदू स्मशानभूमी सुंदर करण्याचे कार्य प्रशंसनीय असल्याचे मनपा आयुक्त म्हणाले. आयुक्तांनी सौंदर्यीकरण कामाची पाहणी केली. सर्व सोयींनी पूर्ण अशी स्मशानभूमी शहरवासीयांना उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी हिंदू स्मशान संस्थेचे अध्यक्ष अॅड. अटल यांचे कौतुक केले.

बातम्या आणखी आहेत...