आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नववर्षाचे स्वागत:शहरात नववर्षाचे उत्साहात स्वागत; ठिकठिकाणी पोलिस तैनात

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात ३१ डिसेंबर व नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष शांततेत व्हावा, म्हणून पोलिस आयुक्तालय हद्दीत ८०० पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. त्यामुळे कुठेही अप्रिय घटना घडली नाही. अगदी शांततेत व उत्साहात नव्या वर्षाचे नागरिकांनी स्वागत केले. रात्री १२ वाजतापासून सुमारे २० मिनिटे फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. अनेकांनी घरातच नवीन वर्षाचे स्वागत केले. त्याचप्रमाणे शहरातील हाॅटेल्स, रेस्टॉरंटमध्येही चांगलीच गर्दी व जल्लोष दिसून आला.

नववर्षाच्या आगमनाचा जल्लोष करण्यासाठी नागरिक वाहनांसह रस्त्यावर येतात. अशात अपघातासारख्या अप्रिय घटना घडण्याची मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता असते. कायदा व सुव्यवस्थेचे पालन व्हावे या दृष्टीने पोलिस आयुक्तालय हद्दीत दोन उपायुक्त, तीन सहायक आयुक्त, ८० अधिकारी व ७०० पोलिस बंदोबस्तासाठी तैनात होते. यादरम्यान ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह मोहिमेंतर्गत दुचाकी व चारचाकी वाहनातील नागरिकांची ब्रिथ अॅनालायझरने तपासणी करण्यात आली. नववर्षानिमित्त हाॅटेल्स, लाॅन व इतर ठिकाणी आॅर्केस्ट्रासह इतर कार्यक्रमांच्या आयोजनासाठी पोलिसांची पूर्वपरवानगी आवश्यक होती. त्यामुळे असे कार्यक्रमही शहरात फारसे झाले नाहीत.

प्रमुख चौकांसह विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत बॅरिकेड्सद्वारे नाकाबंदी केली होती. स्टंट रायडिंग, भरधाव वाहने चालवणाऱ्यांविरुद्ध कारवाईसाठी इंटरसेप्टर वाहन तैनात केले होते. शहरात पायी तसेच दुचाकीद्वारे पेट्रोलिंग करण्यात आली. तसेच रात्री १० ते १ जानेवारीच्या पहाटे ६ वाजेपर्यंत उड्डाणपुलावरील वाहतूक बंद होती. ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकांना मर्यादेत रात्री १२ पर्यंत सूट देण्यात आली होती. त्यामुळे शहरात शांततेत नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...