आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ महिलांची कबड्डी स्पर्धा:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रथमस्थानी

अमरावती5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या क्रीडा संकुलावर गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ कबड्डी (महिला) स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी शुक्रवार 11 रोजी साखळी फेरीतील सर्व सहाही सामने जिंकून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने प्रथम स्थान पटकावले. नागपूर संघ हा गेल्या वर्षीचा प्रथम मानांकीत संघ असल्यामुळे हा संघ थेट साखळी फेरीत खेळला. या संघाने साखळीतील तिन्ही सामने जिंकल्यामुळे 6 गुणांसह हा संघ पहिल्या स्थानी राहिला.

एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबई संघाने दुसरे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडने तिसरे, तर भारती विद्यापीठ, पुणे संघाने चौथे स्थान पटकावले. हे चारही संघ अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेकरीता पात्र ठरले असून पुढील वर्षी जानेवारी 2023 मध्ये होणाऱ्या स्पर्धेत ते पश्चिम विभागाचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.

विजेत्या संघांना संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त पद्माकर देशमुख, पंच निर्णायक प्रमुख सतिश डफडे यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरीत करण्यात आले.

स्पर्धेच्या समारोपीय कार्यक्रम प्रसंगी प्र- कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे यांनी ए.आय.यू. ने विद्यापीठावर सोपविलेल्या आयोजनाच्या जबाबदारीबद्दल आभार व्यक्त केले. क्रीडा विभागाने एका वर्षात व्हॉलीबॉल व कबड्डी यासारख्या लोकप्रिय खेळांचे आयोजन करून सुमारे 150 विद्यापीठांनी या दोन्ही स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला. दोन्ही स्पर्धांच्या अचूक नियोजनाबद्दल त्यांनी क्रीडा विभागाचे कौतुक केले.

विद्यापीठाच्या या आयोजनाकरीता कबड्डी संघटनेव्दारे पात्र पंच उपलब्ध करुन दिल्याबद्दल जितेंद्र ठाकूर आणिसतिश डफडे यांचे आयोजन सचिवांनी आभार मानले. कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन डॉ. अविनाश असनारे यांनी केले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते नियुक्त करण्यात आलेले पंच व इतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डॉ. उमेश राठी, डॉ. कल्याण मालधुरे, डॉ. आतीश मोरे, डॉ. डी.व्ही.रुईकर, वसंत ठाकरे यांचेसह संलग्नित महाविद्यालयातील क्रीडा संचालकांनी महत्त्वाचे योगदान दिले.

बातम्या आणखी आहेत...