आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘शिवाजी’त प्रगतीचे वर्चस्व की विकासाला संधी:60 तासानंतर कळणार; 10 सप्टेंबरला आमसभा, 11 रोजी मतदान

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विदर्भाच्या प्रत्येक जिल्ह्यात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारी सर्वात जुनी शिक्षण संस्था म्हणून लौकीक असलेल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यकारी मंडळाची निवडणूक अवघ्या ६० तासांवर येऊन ठेपली आहे. विद्यमान अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांचे प्रगती पॅनल तर उपाध्यक्ष नरेशचंद्र ठाकरे यांच्या नेतृत्वातील विकास पॅनल यापैकी सत्ता नेमकी कुणाच्या हाती लागणार, हे या निवडणुकीद्वारे ठरणार आहे.

निवडणूक कार्यालयातर्फे घोषित वेळापत्रकानुसार शनिवार, १० सप्टेंबर रोजी पंचवटी चौक स्थित श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयात दुपारी १ वाजता आमसभा सुरु होईल. ३ वाजेपर्यंत कामकाज चालल्यानंतर दुपारी साडे तीन ते साडे चार या वेळात कार्यकारी परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले जातील. त्यानंतर अर्ध्या तासाने छाननी करुन वैध नामांकनाची यादी घोषित केली जाईल.

सायंकाळी ५ ते ६ या वेळात इच्छूकांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुभा असेल. पुढे सायंकाळी ६.३० वाजता उमेदवारांची अंतीम यादी घोषित केली जाईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ८ ते सायंकाळी ५.३० या वेळात मतदान होईल.

हर्षवर्धन देशमुख व नरेशचंद्र ठाकरे यांच्यात अध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून एकमत न झाल्याने या निवडणुकीत दोन पॅनल समोरा-समोर उभे ठाकले आहेत. दरम्यान दोन्ही पॅनलने आपापले उमेदवार घोषित केले असून प्रचारकार्यही सुरु केले आहे. देशमुख व ठाकरे यांच्याशिवाय उपाध्यक्ष अँड. गजानन पुंडकर व डॉ. रामचंद्र शेळके, कोषाध्यक्ष दिलीप इंगोले, कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ, केशवराव गावंडे, केशवराव मेटकर व अॅड. अशोक ठुसे, असे सध्याचे पदाधिकारी आहेत.

राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे स्थान

विस्ताराच्यादृष्टीने सातारा जिल्ह्यातील ‘रयत’नंतर राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची शिक्षण संस्था म्हणून श्री शिवाजी शिक्षण संस्थेची ओळख आहे. अध्यक्ष, कोषाध्यक्ष, तीन उपाध्यक्ष आणि चार कार्यकारिणी सदस्य अशा नऊ पदांसाठी ही निवडणूक होत असून त्यादृष्टीने शिव परिवारातील वातावरण चांगलेच तापले आहे. शिवाजीच्या विद्यमान कार्यकारिणीचा कालावधी २१ सप्टेंबरला पूर्ण होत असल्याने तत्पूर्वीच निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

असा आहे संस्थेचा व्याप

देशाचे प्रथम कृषीमंत्री डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी डिसेंबर १९३२ मध्ये श्री. शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली आहे. सध्यस्थितीत अभियांत्रिकी व वैद्यकीय शाखेसह २४ वरिष्ठ महाविद्यालये, १५४ कनिष्ठ महाविद्यालये, ७५ माध्यमिक शाळा आणि ३५ वसतिगृहे असा या संस्थेचा व्याप आहे. त्यामुळेच या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...