आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थापा:देशवासीयांना अच्छे दिन येण्याच्या थापा

चिखली25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्यानंतर जेवढे पंतप्रधान झाले, त्यामध्ये सर्वात जास्त खोटं बोलणारे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचा नंबर लागतो. सत्तेवर येण्यापूर्वी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा केली. ती त्यांनी पूर्ण केली नाही तर या उलट ते सत्तेवर आल्यापासून शेतकऱ्यांची अवस्था गंभीर झाली आहे. खते, कीटकनाशक, इंधन व जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अच्छे दिन येण्याच्या देशवासीयांना थापा दिल्या, असा आरोप शिवसेनेचे उपनेते तथा शेतकरी नेते लक्ष्मणराव वडले यांनी देऊळगाव धनगर येथे केला.

स्व. शरद जोशी यांच्या ८८ व्या जयंतीनिमित्त ३ सप्टेंबरला शेतकरी संघटनेने आयोजित केलेल्या जिल्हा मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी मुळेअण्णा फाउंडेशनचे रमेशअण्णा मुळे, हवामान अभ्यासक पंजाबराव डख, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष विठ्ठल घाडगे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास कणखर, स्वभाप उपाध्यक्ष समाधान कणखर, स्वभाप जिल्हाध्यक्ष एकनाथ पाटील, पंचायत समिती सदस्या उषा थुट्टे पाटील, दुर्गाबाई घुबे, शिवप्रसाद सारड, डिगांबर चिंचोले, तेजराव मुंढे, रमाकांत महाले, अंकुशराव जाधव, पांडुरंग भुतेकर उपस्थित होते. वडले यांनी पुढे बोलताना आपल्या चळवळीतील आठवणींना उजाळा दिला.

स्व. शरद जोशींचे विचार भरोसा आणि देऊळगाव धनगर या गावांनी अंगीकारले आहेत. या गावातील लोक स्वाभिमानाने जीवन जगत आहे. लाचारीने जगणे शरद जोशींच्या कार्यकर्त्यांना मान्य नाही. आपण शिवसेनेत प्रवेश केला पण आपण लाल बिल्ला छातीवर लावणारा शेतकरी संघटनेचा एकही कार्यकर्ता शिवसेनेत नेणार नाही, असे ठरवलेले आहे. कारण शेतकरी संघटना खिळखिळी करण्याचे पाप माथी मारून घेणार नाही. चळवळ टिकली पाहिजे तरच शेतकऱ्यांवरील अन्याय दूर होईल, असे स्पष्ट मत लक्ष्मणराव वडले यांनी व्यक्त केले. तर हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना पावसाच्या अंदाजाच्या तारखा सांगितल्या. तर रमेशअण्णा मुळे यांनी आपल्या कार्याची माहिती देत, असाध्य रोगाने पीडित लोकांना आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून मदत करण्याचा शब्द दिला. सूत्रसंचालन कृषी योद्धा शेतकरी संघटनेचे ज्ञानेश्वर खरात पाटील यांनी केले, तर आभार पंचायत समिती माजी उपसभापती भानुदास घुबे यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...