आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पडसाद आत्महत्येचे:वनविभागातील महिला कर्मचारीच झाल्या शिवकुमारविरोधात आक्रमक; आरोपीला तीन दिवसांची पोलिस कोठडी, समाजमाध्यमांवर एक ऑडिओ क्लिप व्हायरल

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिवकुमार याचे पोस्टर पायाने तुडवून जाळताना संतप्त महिला कर्मचारी.

हरिसालच्या आरएफओ दीपाली चव्हाण यांनी डीसीएफ शिवकुमारच्या मानसिक जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे. या प्रकरणात शिवकुमारला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, शनिवारी (दि. २७) सकाळपासून समाजमाध्यमांवर एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून, ती आरएफओ दीपाली चव्हाण व त्यांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांमधील संभाषणाची असल्याचे सांगण्यात येत आहे. या क्लिपमध्ये आरएफओ दीपाली चव्हाण यांच्यासोबत बोलताना कथित वरिष्ठ अधिकारी हा अतिशय अपमानास्पद आणि घृणा निर्माण करणारी भाषा वापरत आहे. आरएफओ चव्हाण या अतिशय निडर व कर्तृत्ववान अधिकारी होत्या. त्यांच्या आत्महत्येनंतर वनविभागातील कर्मचारी, अधिकारी तसेच सर्वसामान्यांकडून आरएफओ दीपाली चव्हाण या अतिशय उत्तमपणे काम करणाऱ्या अधिकारी असल्याचे सांगत आहे.

याचवेळी ‘गुगामल’चा आता निलंबित झालेला डीसीएफ शिवकुमार त्यांना मागील काही महिन्यांपासून सातत्याने मानसिक त्रास देत आहे. दरम्यान दिपाली चव्हाण यांच्यासोबत फोनवर एक कथीत वरीष्ठ अधिकारी बोलत असल्याची एक ऑडिओ कॉल क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये दीपाली चव्हाण या अतिशय संयमाने आणि या कथित वरिष्ठाचा आदरपूर्वक वारंवार उल्लेख करताहेत मात्र तो कथित वरिष्ठ अधिकारी संपूर्ण कॉलमध्ये त्यांच्यासोबत ‘लेव्हल’सोडून बोलत आहे. दीपाली या सुद्धा एक अधिकारीच असताना त्यांना वारंवार तू तू असे ‘एकेरी’ शब्दात बोलत आहे. इतकेच नाही तर एसपीला सांगून तुझ्यावर अॅट्रॉसिटी दाखल करण्यासाठी मी आता पाठपुरावा करतो, अशी धमकी देतो आहे. एखाद्या वरिष्ठाकडून कनिष्ठ अधिकाऱ्याचा इतका अपमान का, यातही समोर महिला असताना तिच्यासोबत सन्मानाने बोलने अपेक्षित असताना हा कथीत वरिष्ठ अधिकारी अतिशय अपमानजनक शब्दांचा वारंवार उल्लेख करतो आहे. वारंवार होणारा अपमान तसेच एसपींना सांगून गुुन्हा दाखल करण्याची धमकीसुद्धा त्याने दीपाली चव्हाण यांना दिल्याचे या क्लिपमधून समोर येत आहे.

‘शिवकुमार मुर्दाबाद’ची नारेबाजी
मेळघाटातल्या गुगामलच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण-मोहिते यांच्या आत्महत्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांची शनिवारी (दि. २७) धारणी न्यायालयाने सोमवारपर्यंत (दि. २९) तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून, त्यांची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे. दरम्यान, वन विभागातल्या महिला कर्मचाऱ्यांनी व भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी धारणी पोलिस ठाण्यासमोर शिवकुमार याच्या विरोधात निदर्शने करून त्याचा फोटो जाळत नारेबाजी केली. एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याविरोधात त्याच विभागाच्या अनेक महिला कर्मचारी आक्रमक झाल्या. यावरुन शिवकुमारचा या महिला कर्मचाऱ्यांना किती त्रास होता, ही बाब विचार करण्यास प्रवृत्त करत असल्याची चर्चा आज दिवसभर धारणी परिसरात होती. मृतक दीपाली चव्हाण यांनी गुरुवारी रात्री हरिसाल येथील शासकीय निवासस्थानी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. मृत्यूपूर्वी लिहीलेल्या चिठ्ठीमुळेच धारणी पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन गुरुवारी मध्यरात्रीनंतर शिवकुमारवर गुन्हा दाखल करून शुक्रवारी नागपूर रेल्व स्थानकावरून अटक केली. त्यानंतर त्याला धारणी पोलिस ठाण्यात आणण्यात आले. रात्रभर त्याची कसून चौकशी केल्यानंतर पोलिसांनी शनिवारी दुपारी त्याला न्यायालयात हजर केले. न्या. एम. एस. गाडे यांनी त्याला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

मानवी श्रृंखला तयार करून शिवकुमार याला न्यायालयात नेताना पोलिस.
मानवी श्रृंखला तयार करून शिवकुमार याला न्यायालयात नेताना पोलिस.

दरम्यान, शिवकुमारला न्यायालयात घेवून जाणार असल्याची माहिती भाजपाच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांना तसेच वन विभागात कार्यरत महिला कर्मचाऱ्यांना मिळताच त्यांनी पोलिस ठाण्यावर धडक दिली. शिवकुमारचे पोस्टर पायाने तुडवून जाळून त्यांनी संताप व्यक्त केला. या वेळी या पोलिस ठाण्यासमोर जमलेल्या शेकडो महिला कर्मचारी व भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी शिवकुमारविरोधार घोषणाबाजी केली. शिवकुमारला फाशीची शिक्षा द्या, श्रीनीवास रेड्डी यांना सहआरोपी करून निलंबित करा, तसेच शिवकुमारला पोलिस वाहनातून न्यायालयात न नेता पायदळ नेण्याची मागणी या वेळी तिथे जमलेल्या महिलांनी केली. मात्र पोलिसांनी ती नाकारली. शिवकुमार याला न्यायालयात नेत असताना काही महिला आक्रमक झाल्या होत्या. त्यांनी शिवकुमार जवळ जाण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी कडेकोट सुरक्षा ठेवल्याने पुढील अनर्थ टळला.

शिवप्रसादचे पोस्टर जाळून केला रोष व्यक्त : शिवकुमारकडून विभागातील अन्य महिलांनी अपमानास्पद वागणूक मिळत होती. त्यामुळे त्यांच्या मनातही त्याच्याविरोधात संताप खदखदत होता. दीपाली यांच्या आत्महत्येमुळे त्यांच्या संतापाच्या लाव्हा बाहेर आला. त्यांनी शिवकुमारचे पोस्टर पायाने तुडवून व नंतर जाळून त्याचा तीव्र निषेध केला.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त : या वेळी ठाणेदार विलास कुलकर्णी, सपोनि प्रशांत गिते, पोउनि करुणा मोरे, डीबी स्कॉडचे पीएसआय मंगेश भोयर, पीएसआय सुयोग महापूर, पीएसआय हर्षल चाफले, प्रकाश गिरडकर, प्रशांत बोंडे, सुभाष सावरकर, राम सोळंकी, मोहीत आकाशे, अनुराग पॉल, उमेश उघडे, दामोदर जावरकर, रंजन कढाणे, अरविंद सरोदे, गुप्तहेर खात्याचे अनिल झारेकर यांच्या मार्गदर्शनात न्यायालयासमोर पोलीस दलाचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे संतप्त जमावाकडून न्यायालयासमोर कुठलीही या प्रसंगी कुठलीही अनुचित घटना घडणार याची दखल घेण्यात आली होती.

प्रकरणाचा तपास ग्रामीणच्या एसडीपीओ पाटील यांच्याकडे
आरएफओ दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास अमरावती ग्रामीणच्या एसडीपीओ पुनम पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. याचवेळी दीपाली चव्हाण यांचे पती राजेश मोहीते यांनी अप्पर मुख्य वनसंरक्षक रेड्डी यांच्याविरुद्ध दिलेल्या तक्रारीचीही चौकशी सुरू झाली आहे, अशी माहीती पोलिस अधीक्षक डॉ. हरि बालाजी एन. यांनी शनिवारी दिली आहे. डीसीएफ विनोद शिवकुमारला अटक केल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले असून पोलिस कोठडी मिळाली आहे. आरएफओ दीपाली चव्हाण यांनी मृत्यू पुर्व चिठ्ठीत शिवकुमार हेच आपल्या आत्महत्येसाठी जबाबदार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे त्यांना अटक झाली आहे. मात्र शिवकुमार यांच्या वारंवार तक्रार करुनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता शिवकुमार यांना पाठीशी घालणाऱ्या अप्पर मुख्य वनसंरक्षक रेड्डी यांच्याविरुद्ध शुक्रवारी राजेश मोहीते यांनी तक्रार दिली आहे. त्या तक्रारीची सुद्धा चौकशी सुरू झाली आहे.

पोलिस ठाण्यासमोर महिलांचा संतप्त जमाव
शिवकुमार याला अटक केल्यानंतर पोलिस ठाण्यात आणल्याची माहिती महिताच महिला कर्मचारी व काही संघटनांच्या महिलांनी पोलिस ठाण्याच्या परिसरात भर उन्हात एकच गर्दी केली होती.

पार्थिवावर अंत्यसंस्कार
दीपाली चव्हाण यांच्या पार्थिवावर शुक्रवारी उशिरा रात्री नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मोरगाव येथे अंत्यसंस्कार झाले. मोरगाव हे दीपाली यांचे सासर आहे. दीपाली यांच्या आई, नातेवाईक व गावकरी, वन विभाग कर्मचारी, अधिकारी यावेळी उपस्थित होते.

तगड्या बंदोबस्तात न्यायालयात हजर : दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येमुळे डीएफओ शिवकुमार व अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्याविरुद्ध मनात संतापाची भावना आहे. शनिवारी असंख्य महिला धारणी पोलिस ठाण्यासमोर व न्यायालयासमोर एकत्र आल्या होत्या. त्यांनी शिवकुमारला आपल्या ताब्यात देण्याची मागणी केली. पोलिसांनी बंदोबस्तात त्याला न्यायालयात हजर केले.

बातम्या आणखी आहेत...