आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिनविरोध:महिला बँक निवडणूक; आ. खोडकेंसह 20 संचालक बिनविरोध ; 29 जूनपर्यंत माघार घेण्यास वेळ

अमरावती18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती जिल्हा महिला सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत तब्बल २० संचालिका अविरोध निवडल्या गेल्या. त्यामुळे आता केवळ नांदगाव खंडेश्वर तालुक्यातून निवडून द्यावयाच्या एका जागेसाठी निवडणूक होणार आहे. बिन‌विरोध विजयी उमेदवारांमध्ये माजी अध्यक्ष तथा पॅनलप्रमुख आमदार सुलभा खोडके यांचाही समावेश आहे. विजयी उमेदवारांची अधिकृत घोषणा ११ जुलै या मतमोजणीच्या दिवशी केली जाणार आहे. संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी प्राप्त झालेल्या ४२ अर्जांची छाननी बुधवार, १५ जून रोजी करण्यात आली. यावेळी तब्बल २० उमेदवार महिलांचे अर्ज फेटाळण्यात आले. त्यामुळे अ‌वघे २२ उमेदवारच मैदानात उरले आहेत. दरम्यान, संचालक मंडळ २१ सदस्यीय असल्याने यापैकी २० महिला बिनविरोध विजयी झाल्या असून, केवळ नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील संचालकासाठी दोन महिला एकमेकींसमोर उभ्या ठाकल्या आहेत. अमरावती महापालिका क्षेत्रातून ४, प्रत्येक तालुक्यातून एक याप्रमाणे चौदा तालुक्यातून १४ आणि एससी-एसटी, ओबीसी व व्हीजे-एनटी या तीन संवर्गातून प्रत्येकी एक याप्रमाणे २१ सदस्यीय संचालक मंडळासाठी आगामी १० जुलैला ही निवडणूक होत आहे. २९ जून ही उमेदवारी मागे घेण्यासाठीची अंतिम तारीख असून डीडीआर कार्यालयाचे अविनाश महल्ले हे या निवडणुकीसाठीचे सहायक निवडणूक अधिकारी आहेत. दरम्यान, नांदगाव खंडेश्वर तालुक्याच्या मतदारसंघातून कुण्या एका उमेदवाराने माघार घेतल्यास संपूर्ण निवडणूक अविरोध जाहीर केली जाणार आहे. सध्या या पदासाठी नीता उगले व लता चवाळे एकमेकीसमोर उभ्या ठाकल्या आहेत. १० जुलै रोजी मतदान घेतले जाणार असून, ११ जुलैला मतमोजणीअंती निकाल घोषित केला जाणार आहे. ….तर निवडणूक अटळ ज्यांचे उमेदवारी अर्ज फेटाळले गेले, त्यांना आजपासून तीन दिवस अर्थात १५ ते १७ जून या कालावधीत अपिलात जाण्याची संधी आहे. त्यामुळे काही महिला अपीलात गेल्यास या निवडणुकीला वेगळे वळण मिळू शकते. संबंधित न्यायालय काय निकाल देते, यावर बरेच काही अवलंबून आहे. त्यामुळे आज जरी २० महिला संचालक अविरोध निवडून आल्या असे चित्र असले तरी भविष्यात हे चित्र बदलू शकते, असा अंदाज आहे. या आहेत बिनविरोध विजयी संचालिका २० संचालिका बिनविरोध विजयी झाल्या आहेत. यामध्ये आमदार सुलभा खोडके, मंदाकिनी बागडे, सुचिता काळे, संजीवनी देशमुख, नीता मिश्रा, ज्योती धोपटे, अंजली चौधरी, पुष्पा गावंडे, रेश्मा सावरकर, मंगलाताई कोहळे, अर्चना शिंदे, दर्शना देशमुख, माधुरी ठाकरे, सुधाताई पाटील, ज्योत्सना कोरपे, हर्षा जगताप, उषा उपाध्याय, दीपाली भेटाळू, सोनाली पाटील व प्रिती पाल यांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...