आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजब प्रकार:एक्स-रे मशीन प्रिंटरविना; फिल्म नाही, रुग्णांना सोबत न्यावा लागतो स्मार्ट फोन

चांदूर बाजार4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आरोग्य सेवेचे आधुनिकीकरण, डिजिटलायझेशनच्या नादात अर्धवट यंत्रणा उभारून आरोग्य विभाग रुग्णांची परवड करीत असल्याचा दुर्दैवी प्रकार चांदूर बाजार येथील ग्रामीण रुग्णालयात सुरू आहे. सुमारे दीड वर्षांपूर्वी या रुग्णालयात डिजिटल एक्स-रे मशीन बसवण्यात आली. मात्र, डिजिटल प्रिंटरच मिळाले नाही. यंत्रणाच आंधळी बनली आहे. त्यामुळे, दीड वर्षांपासून एक्स-रे फिल्म (हार्डकॉपी) रुग्णांना मिळत नाही. त्याऐवजी त्यांना स्मार्ट फोन घेऊन जावे लागते. स्मार्ट फोनवर ही डिजिटल फिल्म पाठवली जाते. जेथे ती हार्डकॉपीतच अस्पष्ट दिसते. तेथे लहानशा मोबाइल स्क्रिनवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना काय दिसत असेल? ते योग्य निदान करून उपचार करीत असतील काय? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. रुग्णांच्या आरोग्याशी खेळ करणारा हा प्रकार चिड आणणारा असून यामुळे परिसरातील शेकडो रुग्णांना त्रास सहन करावा लागला आहे. राज्यमंत्र्यांच्या तालुक्यातच डिजिटल प्रिंटर अभावी एक्स-रे फिल्म मिळत नसल्याने जिल्ह्याचा आरोग्य विभाग, प्रशासन गाढ निद्रेत असल्याचे हे द्योतक आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाने गतिशील निदान आणि उपचाराच्या उद्देशाने जिल्हा सामान्य रुग्णालय तथा उप जिल्हा रुग्णालयांसह ग्रामीण रुग्णालयात डिजिटल एक्स-रे मशीन लावण्याचा निर्णय घेतला. पूर्वीच्या तंत्रज्ञानाचा वापर करून एक्स-रे काढणे ही तंत्रज्ञ व रुग्णांसाठी वेळखाऊ पद्धत होती. कारण त्या पद्धतीने एक्स-रे काढलेली फिल्म ही पाण्याने धुवून काढावी लागत होती. ही वेळखाऊ पद्धत असल्याने पिंपरी चिंचवड येथील कृष्णा डायग्नोस्टिक्स लिमिटेड या कंपनीला दीड वर्षांपूर्वी कंत्राट देण्यात आले. त्याप्रमाणे पुरवठादार कंपनीने डिजिटल एक्सरे मशीनचा पुरवठा येथील ग्रामीण रुग्णालयाला केला.

मात्र, डिजिटल प्रिंटरच दिले नाही. त्यामुळे अपुऱ्या यंत्रणेसह काम सुरू करण्यात आले. मागील दीड वर्षांपासून पुरवठादार कंपनीने प्रिंटर द्यावे म्हणून पाठपुरावा केला जात आहे. परंतु, ही पुरवठादार कंपनी दखलच घेत नसल्याने अजुनही एक्स-रे प्रिंटर उपलब्ध झाले नसल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.

ग्रामीण रुग्णालयासोबत तालुक्यातील ६७ गावांसह शहरातील रुग्ण जोडल्या गेले आहेत. १ लाख ९२ हजार लोकसंख्या असलेल्या या तालुक्यात उपचारासाठी दररोज सुमारे २०० रुग्ण ग्रामीण रुग्णालयात येतात. दुखापत, अपघात अथवा हाडांच्या इतर दुखण्याचे एक्स-रे काढण्यासाठी वैद्यकीय अधिकारी रुग्णांना एक्स-रे विभागात पाठवतात. मात्र एक्सरे काढल्यानंतर त्याची फिल्म रुग्णांच्या हातात देण्यासाठी एक्स-रे प्रिंटरच नाही. त्यामुळे रुग्णांच्या सोयीसाठी आणि पुढील उपचारासाठी स्मार्ट फोनमध्ये मॉनिटरवरील एक्स-रेचा फोटो काढून तो रुग्णांना दिला जातो. मात्र बहुतेक रुग्णांकडे स्मार्ट फोन नसतो. त्यामुळे, त्यांना ज्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडे उपचार करायचा आहे, त्यांच्या व्हॉटस्अ‍ॅपवर ग्रामीण रुग्णालयातील क्ष-किरण तंत्रज्ञ मयुर बेलसरे स्वत: फोटो पाठवतात. मात्र, बहुतेक एक्स-रे काढायला आलेल्या रुग्णांना स्मार्ट फोन आणायला सांगीतले जात असल्याचे रुग्णांनी सांगीतले. या विचित्र प्रकारामुळे रुग्णांवर कितपत प्रभावी उपचार होत असतील असा प्रश्न आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे.

राज्यमंत्र्यांचा तालुका; लक्ष देण्याची रुग्णांची मागणी

आरोग्य सेवा गतिमान व्हावी, या उद्देशाने शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च केला जात आहे. परंतु, उपचाराशी संबंधित यंत्रणाच तोकडी असल्याने रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागतो. चांदूर बाजार तालुका हा राज्यमंत्री व आ.बच्चू कडू यांच्या मतदारसंघात असून त्यांचे गावही येथेच आहे. डीजिटल एक्स-रे प्रिंटर उपलब्ध नसल्याने रुग्णांना त्यांच्या किंवा नातेवाईंच्या स्मार्ट फोनवर एक्स-रेची कॉपी दिली जाते. ही बाब त्रासदायक ठरत असल्याने राज्यमंत्र्यांनी याकडे जातीने लक्ष घालण्याची मागणी रुग्णांद्वारे केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...