आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यातील 168 सेवा सहकारी संस्थांचे अवसायन रद्द करा:आमदार यशोमती ठाकूर यांची नोटीस परत घेण्याची मागणी

अमरावती6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील १६८ सेवा सहकारी संस्थांच्या अवसायन नोटीस काढण्यात आल्या आहेत. यामुळे संपूर्ण सहकार क्षेत्र मोडकळीस येण्याची भीती निर्माण झाली असल्यामुळे या अवसायन नोटीस तत्काळ रद्द करण्यात याव्या, अशी मागणी आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी सहकार मंत्री अतुल सावे यांना दिलेल्या पत्रातून केली आहे.

आज, मंगळवार, १४ मार्च रोजी आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी हे पत्र सहकार मंत्र्यांना दिले. याबाबत भूमिका मांडताना त्या म्हणाल्या की, सभेत या विषयावर चर्चा होते, लगेचच सभेचे इतिवृत्त तयार होते अन् त्यावर सहकार व पणन विभाग, जिल्हा निबंधक व संबंधित उपनिबंधक जलदगतिने अवसायन नोटीस काढतात, असा अफलातून प्रकार सध्या सुरु आहे. परंतु यामुळे संपूर्ण सहकार क्षेत्र मोडीत निघण्याची भीती निर्माण झाली असून सोबतच गावा-गावातील कर्जदार शेतकरी हतबल होत आहेत. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार पाहता सहकार क्षेत्र जाणीवपूर्वक मोडकळीस आणण्याचे एक षङ्यंत्र तर नाही ना ? असा संशय येतो. त्यामुळे ही गंभीर बाब तातडीने विचारात घेऊन जनहितार्थ निर्णय घेतला जावा, अशी मागणीही त्यांनी सहकार मंत्र्यांकडे नोंदविली.

शेतकऱ्यांसाठी गाव पातळीवरील सेवा सहकारी संस्था महत्वाच्या असतात. कारण याच संस्थांमार्फत शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळत असते. तसेच सहकार क्षेत्रातील हा महत्वाचा घटक आहे. मात्र या संस्थाच जर अवसायानात निघाल्या तर याचा दुरगामी परिणाम सहकार क्षेत्राच्या वाढीवर होवू शकतो. या सर्व बाबींचा विचार करुन अमरावती जिल्ह्यातील ज्या १६८ सहकारी संस्था अवसायनात काढण्याची ३ मार्च २०२३ च्या नोटीस तत्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणी आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी या पत्रातून केली आहे.

बातम्या आणखी आहेत...