आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योगाभ्यासाचे:योगाचार्य त्र्यंबक गुरुजी देश-विदेशात देताहेत योगाभ्यासाचे धडे

अमरावती10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू झालेली योग प्रचाराची परंपरा कायम

जागतिक योग दिन विशेष

स्वातंत्र्यपूर्व काळापासून योग, शारीरिक शिक्षण व मल्लखांबमध्ये श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचा (एचव्हीपीएम) डंका राहिला आहे. मंडळाची स्थापना १९१४ मध्ये आद्य संस्थापक स्व. अंबादासपंत वैद्य यांनी केली. त्यानंतर येथे विविध व्यायाम प्रकारांना सुरुवात झाली. योगाचार्य व आयुर्वेदाचार्य त्र्यंबक जोशी गुरुजी यांनी योगासनांसह मल्लखांबचे १९२४ पासून धडे देण्यास सुरुवात केली. येथूनच देशभरात त्र्यंबक गुरुजींच्या नेतृत्वात जी तालिम पथके पाठवली जायची त्यांनी योगासनांचा प्रचार व प्रसार केला.

१९३६ च्या बर्लिन (जर्मनी) बर्लिन ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभात सहभागी होण्यासाठी गेलेल्या ‘एचव्हीपीएम’च्या पथकाने योगासने, मल्लखांबवर योगासने सादर करून जगाला भारतीय योगांची ओळख करून दिली होती.

‘एचव्हीपीएम’मध्ये उन्हाळी शिबिरात अनेक विद्यार्थी शिक्षण घ्यायचे. पुढे याच शिष्यांनी योगासनात यश मिळवत राज्यासह देश-विदेशात योगासनांचा प्रचार केला. त्यात बृहन महाराष्ट्र योग परिषदेचे सरकार्यवाह डॉ. अरुण खोडस्कर यांचा समावेश आहे. डॉ. खोडस्कर यांनी लोणावळा येथील जगातील पहिल्या कैवल्यधाम योग संशोधन संस्थेतही प्रशिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी मालदीवमध्ये मुस्लीम महिला योग शिक्षिकेला मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे मालदीव, श्रीलंका, बाली, इंग्लंड, हॉलंड, जर्मनी, डेन्मार्क, अमेरिका, आफ्रिकन देशांमध्येही योगाचा प्रचार केला.

देशातील सर्वच राज्यांमधील विद्यार्थी हे एचव्हीपीएम येथे शारीरिक शिक्षणाचे धडे घेण्यासाठी येत असतात. त्यांना प्रामुख्याने योगासनाचे धडे दिले जातात. या असंख्य विद्यार्थ्यांनी आपापल्या राज्यांमध्ये जाऊन योगासनाचे प्रशिक्षक, क्रीडा शिक्षक, शारीरिक शिक्षक म्हणून काम सुरू केले. त्यामुळे नागरिकांमध्ये योगासनांची आवड निर्माण झाली. शरीर तंदुरुस्त ठेवण्याचे एक महत्त्वाचे माध्यम म्हणून योगासनांचा स्विकार करण्यात आला. चिखलदरा येथील रम्य स्थळी ‘एचव्हीपीएम’ने कायमस्वरूपी योग प्रशिक्षण केंद्र सुरू केले असून, येथे देशाच्या विविध राज्यांमधील योगप्रेमी योगसाधनेसह बारकावे शिकण्यासाठी येतात. येथून परतल्यानंतर योगाचा प्रचार व प्रसार करतात अशी माहिती डॉ. खोडस्कर यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...