आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करून तिच्यावर मातृत्व लादणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्रमांक ४) एस. एस. सिन्हा यांच्या न्यायालयाने बुधवारी २० वर्षे सश्रम कारावास, १५ हजार रुपये दंड व दंड भरल्यास १ वर्ष अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. ही घटना बेनोडा ठाण्याच्या हद्दीत २७ ऑगस्ट २०१९ रोजी उघडकीस आली होती. बळीराम उर्फ गोलू भुजनसिंग युवनाते (३२) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायालयात दाखल दोषारोपपत्रानुसार, पीडित अल्पवयीन मुलीचे पोट वाढलेले दिसल्यामुळे तिच्या आईला संशय आला. त्यामुळे आईने २४ ऑगस्ट २०१९ रोजी मुलीला डॉक्टरांकडे नेऊन तपासणी केली. त्यावेळी तपासणी केल्यावर पीडित मुलगी ही ६ ते ७ महिन्यांची गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
त्यामुळे आईने मुलीची विचारपूस केली. यावेळी पीडित मुलीने आईजवळ आपबीती कथन केली. जवळच्या एका नातेवाइकाने नोव्हेंबर २०१८ ते दिवाळी दरम्यान तिच्यासोबत अनेक वेळा बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ज्यावेळीही संधी मिळत होती. त्यावेळी तो बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होता, असे तिने आईला सांगितले. हा धक्कादायक प्रकार कळल्यावर पीडित मुलीच्या आईने बेनोडा पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी बळीराम विरुद्ध गुन्हा दाखल केला. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक गणपत गंगाधर पुपुलवार यांनी या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. या प्रकरणात न्या. एस. एस. सिन्हा यांच्या न्यायालयात ५ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. या प्रकरणात कालांतराने पीडित मुलीने एका मुलीला जन्म दिला होता.
पीडित मुलगी आणि बाळ यांच्या डीएनए तपासणी अहवालावरून आरोपी हा नैसर्गिक पिता असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार न्या. एस. एस. सिन्हा यांच्या न्यायालयाने आरोपी बळीरामला दोषी ठरवून २० वर्षे सश्रम कारावास, १५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १ वर्ष अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच पीडित मुलीला मनोधैर्य योजनेंतर्गत नुकसानभरपाई देण्याकरिता न्यायालयाने जिल्हा विधी प्राधिकरण यांना निर्देशित केले. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता मिलिंद शरद जोशी यांनी यशस्वी युक्तीवाद केला. पैरवी अधिकारी म्हणून कय्युम सौदागर व अरुण हटवार यांनी काम पाहिले.
महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला 10 वर्षे कारावास
अमरावती
एका महिलेच्या घरात अनधिकृतरीत्या प्रवेश करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्रमांक ३) निखिल पी. मेहता यांच्या न्यायालयाने बुधवारी १० वर्षे सश्रम कारावास, ११ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. ही घटना २६ मार्च २०१७ रोजी शिरखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली होती.
विधी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाल्या ऊर्फ राहुल साहेबराव लोखंडे (३५) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. २५ मार्च २०१७ रोजी बाल्या उर्फ राहुलने पीडित ३५ वर्षीय महिलेच्या घरात अनधिकृतरीत्या प्रवेश करून त्यांच्यावर अत्याचार केला होता. या प्रकरणी पीडित महिलेने २६ मार्च २०१७ रोजी शिरखेड ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी बाल्या उर्फ राहुलविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली. तपासाअंती आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणात न्यायाधिश निखिल मेहता यांच्या न्यायालयात ५ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. साक्षीदारांची साक्ष आणि सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्या. निखिल मेहता यांच्या न्यायालयाने आरोपी बाल्या ऊर्फ राहुलला १० वर्षे सश्रम कारावास, ११ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. दंडातील रक्कम पीडितेस देण्याचे निर्देशही न्यायालयाने यावेळी दिलेत. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता मंगेश भागवत यांनी यशस्वी युक्तिवाद केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.