आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदला:लहान भावाला चाकू मारणाऱ्याचा मोठ्या भावाने केला खून; मुख्य संशयितांसह 6 जणांना अटक

अमरावती18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लायब्ररी चौकात राहणाऱ्या एका २३ वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून बुधवारी (दि. १०) उशिरा रात्री साडेबारा वाजता खुन झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य मारेकऱ्यासह सहा जणांना अटक केली आहे. मृतक तरुणाने सहा महिन्यांपुर्वी मुख्य मारेकऱ्याच्या लहान भावावर जीवघेणा हल्ला चढवून त्याला जखमी केले होते. त्याच हल्ल्याच्या सुडातून तरुणाचा खून झाला असल्याचे फ्रेजरपुरा पोलिसांनी सांगितले आहे.

निखील राजेश तिरथकर (२३, रा. लायब्ररी चौक, फ्रेजरपुरा, अमरावती) असे मृताचे तर देवा रामअधार जयस्वाल (२६) असे मुख्य मारेकऱ्याचे नाव आहे. देवा जयस्वालसह विजय किसनलाल मंडले (३९), शक्ति प्रविण वाघमारे (२७), करण श्याम मंडले (२४), विशाल पवन मंडले (२३) आणि शुभम प्रकाश परिवाले (२४, सर्व रा. फ्रेजरपुरा) या सहा जणांना पोलिस आयुक्तांच्या विशेष पथकाच्या मदतीने फ्रेजरपुरा पोलिसांनी गुरूवारी पहाटेपर्यंत अटक केली आहे. निखील तिरथकर याने ऑक्टोंबर २०२२ मध्ये देवा जयस्वालच्या लहान भावावर चाकूने वार करुन त्याच्यावर प्राणघातक हल्ला चढवला होता.

त्यावेळी निखील तिरथकरविरुध्द फ्रेजरपुरा पाेलिसांनी प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्याचवेळी पासून देवा जयस्वाल आणि निखील तिरथकर यांच्यात ‘खुन्नस’ होती.

दरम्यान बुधवारी रात्री साडेदहा ते अकरा वाजताच्या सुमारास लायब्ररी चौक, फ्रेजरपुरा परिसरात शक्ति वाघमारेचा त्याच्या घराच्या आजूबाजूने राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत वाद झाला होता. ते भांडण चांगलेच वाढले होते. दरम्यान या वादात निखील तिरथकरने मध्यस्थी केली होती. तसेच हा वाद झाल्याची माहीती फ्रेजरपुरा पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे ठाणेदार गाेरखनाथ जाधव यांच्यासह पोलिस ताफा फ्रेजरपुरा चौकात पोहचला होता.

पोलिसांनी भांडण करणाऱ्यांसह जमलेल्या लोकांना घरात पाठवले. त्यावेळी शक्ती आणि निखील हे सुध्दा आपआपल्या घरात निघून गेले होते. दरम्यान पोलिस त्याच चौकात हजर असताना सुमारे शंभर ते दिडशे मीटर अंतरावरील एका गल्लीत निखील तिरथकर गेला असता देवा जयस्वाल, शक्ती वाघमारे व ईतर चौघे असे एकूण सहा जणांनी मिळून निखीलला अडवले. त्यावेळी देवा जयस्वालने निखीलच्या दोन्ही मांडीवर चाकूचे घाव केले. त्यानंतर मारेकरी घटनास्थळावरुन पसार झाले.

त्याचवेळी चौकात उभे असलेल्या पोलिसांना माहीती पडताच पोलिसांनी गल्लीत धाव घेतली तर निखील तिरथकर हा रक्तबंबाळ स्थितीत पडून होता. त्याला तत्काळ पोलिस वाहनातून इर्विनमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरूच असताना काही वेळात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल करुन सहा जणांना अटक केली असल्याचे फ्रेजरपुराचे ठाणेदार गोरखनाथ जाधव यांनी सांगितले आहे.