आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करून तिच्यावर मातृत्व लादणाऱ्या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्र. ४) एस. ए. सिन्हा यांच्या न्यायालयाने बुधवारी ७ वर्षे सश्रम कारावास, ५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ६ महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. ही घटना दत्तापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. मनोज तुकाराम मढावी (२२, रा. जुना धामणगाव, धामणगाव रेल्वे) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायालयात दाखल दोषारोपपत्रानुसार, २३ जून २०१८ रोजी पीडित अल्पवयीन मुलीची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे आईने तिला वैद्यकीय उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. यावेळी ती गर्भवती असल्याचे समोर आले. २५ जून २०१८ रोजी पीडित अल्पवयीन मुलीने एका मुलीला जन्म दिला. या प्रकरणी दत्तापूर पोलिसांनी ५ जुलै २०१८ रोजी पीडित मुलीचे बयाण नोंदवले. यावेळी तिने मनोज मढावीसोबत प्रेमसंबंध होते. त्या प्रेमसंबंधातून आपल्याला दिवस गेले, असे सांगितले. या बयाणाच्या आधारावर दत्तापूर पोलिसांनी मनोज मढावीला अटक केली. त्यानंतर पोलिसांनी मनोज, पीडित मुलगी व नवजात बालकाच्या रक्ताचे नमुने प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवले. अहवाल प्राप्त झाल्यानंतर नवजात बालक हे पीडित मुलगी व मनोजचेच असल्याचे निष्पन्न झाले. तपासाअंती आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. या प्रकरणात न्यायाधीश एस. ए. सिन्हा यांच्या न्यायालयात ११ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. साक्षीदारांची साक्ष आणि सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी मनोज मढावीला ७ वर्षे सश्रम कारावास, ५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ६ महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता दिलीप तिवारी यांनी यशस्वी युक्तीवाद केला. कोर्ट पैरवी म्हणून मधू उईके व अरुण हटवार यांनी काम पाहिले. |
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.