आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासुमारे ८.५ लाख लोकसंख्येच्या शहरात वाहतुकीला शिस्तच नाही. काही मुख्य चौकांमधून तर झेब्रा क्राॅसिंगच गायब झाले आहेत. काही ठिकाणी झेब्रा क्राॅसिंग असले तरी ते फारच अस्पष्ट दिसतात. त्यामुळे त्यावर सर्रास वाहने उभी असून पायी चालणाऱ्यांनी नेमका कोणत्या वेळी रस्ता ओलांडायचा याचेही संकेत ट्रॅफिक सिग्नलवरून मिळत नसल्याने त्यांना जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागत असल्याचे धक्कादायक वास्तव ‘दिव्य मराठी’ला प्रत्यक्ष चौकांची पाहणी केल्यानंतर आढळले.
सुव्यवस्थित वाहतुकीसाठी अद्ययावत ट्रॅफिक सिग्नलसह स्ट्रीट फर्निचर मुख्य चौकांमध्ये गरजेचे असून, महानगरपालिका आणि वाहतूक पोलिसांकडून झेब्रा क्राॅसिंगच्या वापराबाबत मोठ्या प्रमाणात जागृतीची आवश्यकता आहे. कारण झेब्रा क्राॅसिंगचा रहदारीचे मोठे रस्ते ओलांडताना वापर करावा लागतो, ही बाबच एव्हाना शहर वासीयांच्या विस्मरणात गेली आहे.
अपघातामुळे इर्विन टी-पाॅइंट रस्ता दुभाजकाने करावा लागला बंद इर्विन चौकातील मर्च्युरी टी-पाॅइंटवर वाहतूक सिग्नल नसल्याने येथे सतत अपघात व्हायचे. त्यामुळे हे ठिकाण ब्लॅक स्पाॅट म्हणून प्रसिद्ध झाले होते. कारण डाव्या बाजुने उड्डाण पुल याच ठिकाणी संपायचा. तसेच इर्विनकडून जुना काॅटनमार्केट, जयस्तंभ चौक, तखतमल बाजारपेठेकडे उजव्या बाजूचा रस्ता जायचा.
या रस्त्याला छेदून ‘इर्विन’चे शवागार, रेल्वे स्थानकाकडे जावे लागायचे. त्यामुळे पायी रस्ता ओलांडणारे अन् इर्विन चौकातील वाहनांचे सिग्नल सुटल्यामुळे येथे एकच गर्दी व्हायची परिणामी वाहतुकीची कोंडी व दररोज अपघात ठरलेलेच होते. त्यामुळे हा टी-पाॅइंट रस्ता दुभाजकाद्वारे कायमचा बंद करण्यात आला आहे.
इर्विन (डाॅ. बाबासाहेब आंबेडकर) चौक
नागपूर, जिल्हाधिकारी कार्यालयांसह उड्डाण पुलाकडे याच चौकातून जावे लागते. जिल्हा सामान्य रुग्णालयासह परिसरात ५ ते ६ शाळा असल्याने दिवसभर हजारो वाहने, नागरिकांची वर्दळ असते.
येथे झेब्रा क्राॅसिंग असले तरी त्यावरून कोणीही रस्ता ओलांडत नाहीत. कारण वाहने झेब्रा क्राॅसिंगपुढे उभी होती. नागरिकांना नाइलाजाने मुख्य रस्त्यावरून वाहनांना अडवत रस्ता ओलांडावा लागल्याचे दिसून आले.
नागरिक पुढे आल्याने अचानक पुढील वाहनांना ब्रेक लावावे लागल्यामुळे मागून येणारे वाहन त्याला धडकल्याचे दिसले. ट्रॅफिक सिग्नलसह वाहतूक पोलिसही येथे उपस्थित होते. परंतु, झेब्रा क्राॅसिंगवरून रस्ता ओलांडण्याचा सिग्नल बंदच आहे.
गर्ल्स हायस्कूल चौक
नागपूरकडे जाणाऱ्या सर्वच एसटी बसेस या येथून जातात. याच चौकात गर्ल्स हायस्कूल, दयासागर हाॅस्पिटल, हाॅटेल महेफिल, महेफिल इन्न, पीडब्ल्यूडी कार्यालय आहे. हजारो वाहनांची दिवसभरात ये-जा सुरू असते. नागरिकांचीही मोठी वर्दळ राहते.
येथेही झेब्रा क्राॅसिंग असले तरी ते फारच पुसट दिसते. त्यावर सर्रास वाहने उभी होती. या धोकादायक मार्गावर नागरिक धावपळ करीत रस्ता ओलांडताना दिसले. कोणता सिग्नल सुरू झाला. याकडे लक्ष न देता तसेच झेब्रा क्राॅसिंगवरून न जाता नागरिक जेथून जागा मिळेल तेथून ते रस्ता ओलांडत होते.
विद्यार्थी, रुग्णांचे नातेवाइक, लहान मुलांचा हात धरून काही महिला व पुरुष घाबरत रस्ता ओलांताना दिसून आले. नियमांचे पालन झाले तर यांनाच सुरक्षित रस्ता ओलांडता येईल.
राजकमल चौक
महापालिकेलगत मुख्य बाजारपेठेत शहराच्या हृदय स्थानी असलेल्या राजकमल चौकात दररोज हजारो वाहने ये-जा करतात.
येथे झेब्रा क्राॅसिंगच नसल्याने दिवसभरात शेकडो नागरिक हा रस्ता जीवावर उदार होऊन ओलांडत असल्याचे दिसून आले.
अगदी सिग्नल सुरू झाल्यानंतरही घाईत असलेल्या नागरिकांना आणि वाहनचालकाचा अपघात होईल, याचेही भान नव्हते.
चौकात वाहतूक पोलिस असले तरी ते पायी रस्ता ओलांडणाऱ्यांना रोखत नसल्याचे व बघ्याची भूमिका घेत असल्याचे दिसले.
पंचवटी चौक
नागपूर, गाडगेनगर, विभागीय आयुक्त कार्यालयाकडे जाणारा हा रस्ता असून, श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, बस थांबे, पीडीएमसी मुले व मुलींचे वसतिगृह याच चौकात आहे.
दिवसभरात या चौफुलीवरून हजारो वाहनांची वर्दळ असते. अनेकजण येथून पायी ये-जा करतात. खेळाडूही सायकलने येतात.
रस्त्याकडे बारकाईने बघितले तरच झेब्रा क्राॅसिंग दिसते. त्याचा रंग फिक्कट झाल्याने येथे झेब्रा क्राॅसिंग असल्याचे सहज कळत नाही.
येथे कधी वाहतूक पोलिस असतात किंवा कधी नसतातही. ट्रॅफिक सिग्नल असले तरी वाहने झेब्रा क्राॅसिंगच्या पुढे अन् पायी चालणारे नागरिक कुठूनही रस्ता ओलांडताना दिसले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.