आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘एकच मिशन-जुनी पेन्शन’ अशी घोषणा देत जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांनी आज, गुरुवारी जिल्हा प्रशासनाला संपाची नोटीस दिली. हा संप आगामी शुक्रवार, १४ मार्चपासून सुरू होत आहे. त्याची आगाऊ सूचना यापूर्वीच देण्यात आली आहे. दरम्यान, रितसर प्रक्रियेचा एक भाग म्हणून गुरुवारी दुपारी प्रभारी सीईओ संतोष जोशी यांना संघटनेतर्फे एक नोटीस-वजा-निवेदन सादर करण्यात आले. सन २००५ नंतर सेवेत रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू नाही. त्यामुळे तहहयात शासकीय सेवा देणाऱ्या वृद्ध व्यक्तींना अत्यंत हलाखीचे जीवन जगावे लागते. त्यांचा औषधोपचार आणि आहार-विहाराचा खर्च भागेल, एवढीही रक्कम इपीएस-९५ च्या पेन्शन सूत्रानुसार मिळत नाही. त्यामुळे आतापर्यंत निवृत्त झालेल्या व सध्या नोकरी करीत असलेल्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला १९८२ साली लागू करण्यात आलेली जुनीच पेन्शन योजना हवी, अशी मागणी केली आहे.
या मागणीच्या अनुषंगाने गेल्या काही दिवसांत बरीच आंदोलने झाली. सर्व कर्मचारी संघटना आणि वेगवेगळ्या खात्याचे कर्मचारी यांनी एकत्र येत मोर्चे, निदर्शने, उपोषण आदी आंदोलने केली. विधान परिषद निवडणुकीच्या माध्यमातूनही आपला विरोध प्रकट केला. परंतु सरकारने अजूनही ही मागणी मान्य केली नाही. त्यामुळेच सर्वांनी एकसंघ होत १४ मार्चपासून बेमुदत काम बंद आंदोलन अर्थात संप करण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनाची नोटीस महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या लेटरहेडवर देण्यात आली.
निवेदन-वजा-नोटीस सादर करताना कर्मचारी युनियनचे प्रदेश उपाध्यक्ष पंकज गुल्हाने, जिल्हा सचिव संजय राठी, इतर पदाधिकारी राजेश रोंघे, संजय येऊतकर, चंदूभाऊ टेकाडे, विजय उपरीकर, सतीश पवार, राहुल रायबोले, सक्षम चांदुरे, परमेश्वर राठोड, दिनेश तांबडे, आदित्य तायडे, प्रतीक काळे, पंकज आसरे, नितीन पवार, गिरीश उर्फ विजय कोठाळे, राजेश गाडे आदी उपस्थित होते.
...तर अर्थसंकल्पही अडचणीत
जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प आगामी २० ते २२ मार्चदरम्यान सादर केला जाणार आहे. सद्या सीईओ अविश्यांत पंडा सुटीवर आहेत. ते १५ मार्चनंतर परततील. त्यांच्या परतण्याच्या वेळीच संप सुरू होणार असल्याने जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागांचे कामकाज रखडणार आहे. त्यामुळे त्याच आठवड्यात सादर होणारा अर्थसंकल्प व दैनंदिन कामे अडचणीत येण्याची भीती निर्माण झाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.